दिवाळी म्हटलं की, प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर उजळलेली घरे, फुलांचा सुगंध, गोड पदार्थांचा आस्वाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेमाने दिलेली भेटवस्तू हेच चित्र उभं राहतं. आजकाल बाजारात शेकडो प्रकारचे गिफ्ट हॅम्पर पाहायला मिळतात; पण त्यात नावीन्य क्वचितच दिसतं. मात्र, यंदाच्या दिवाळीत एका तरुण उद्योजिकेनं असं भन्नाट सरप्राइज गिफ्ट हॅम्पर तयार केलं आहे की, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. बाहेरून दिसायला अगदी काडीपेटीच्या डब्यासारखं; पण आतमध्ये असा मिठाईचा स्फोट दडला आहे की, पाहणारा क्षणात खुश होईल.

जमशेदपूर येथील रशिका नावाच्या एका तरुण उद्योजिकेनं या दिवाळीत ‘चॉकलेट बॉम्ब हॅम्पर’ सादर केलं आहे. नाव ऐकून काही तरी वेगळं वाटेल; पण हा बॉक्स हातात घेतला की कोणालाही कळत नाही की, हे नेमकं आहे तरी काय! कारण- तो दिसायला अगदी खर्‍या फटाक्यासारखा आहे. अनार, रॉकेट, चकरी व बुलेट बॉम्ब अशा गोष्टी त्या बॉक्समध्ये आहे. पण, त्या सगळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते फुटणारे नाहीत, तर खायचे फटाके आहेत.

हॅम्पर उघडताच आतून रंगीबेरंगी फटाक्यासारखे बॉम्ब दिसतात; पण त्यांचा कागद काढला की, आतून बदाम, पिस्ता, केशर आणि ड्रायफ्रूट फ्लेवरची चॉकलेट्स निघतात. हे चॉकलेट बॉम्ब एवढे खरे वाटतात की मुलं तर सोडा, मोठेसुद्धा पहिल्यांदा घाबरतात. “अरे हे खरंच फुटणार तर नाहीत ना,”, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. म्हणूनच हे गिफ्ट आता सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.

रशिका म्हणते की, ती दरवर्षी दिवाळीसाठी काहीतरी वेगळं बनवते. पण, यंदा तिनं ‘फटाके नकों गोड दिवाळी’ अशी थीम ठेवली. खरे फटाके न पेटवता, तिने चवीतूनच धमाका करण्याचा प्लॅन केला. त्यामुळे या हॅम्परमध्ये कुठलेही फुटणारे किंवा प्रदूषण करणारे पदार्थ नाहीत; पण मजा मात्र भरपूर आहे.

फक्त चॉकलेट बॉम्बच नाही, तर रशिकानं घर सजवण्यासाठी सुंदर कँडल्स, तोरण आणि फुलांसारख्या गोष्टीही त्यात बनवून ठेवल्या आहे. तिच्या या भन्नाट कल्पनांची लोक भरपूर प्रशंसा करीत आहेत. अनेक लोक मजेत म्हणतात – “अगं, हे गिफ्ट पाहिलं की कळतच नाही… हे लावायचं की खायचं?”

आजच्या काळात दिवाळीचा आनंद फटाक्यांच्या आवाजात नव्हे, तर लोकांच्या हसण्यात असायला हवा. अशा वेळी ‘चॉकलेट बॉम्ब हॅम्पर’सारखी वस्तू हे केवळ गिफ्ट नसून, नव्या विचारांची गोड आठवण बनून राहते.