Man Left Bleeding After Road Rage Attack : बेशिस्त ड्रायव्हिंगमुळे रोड-रेज अर्थात गाडी चालवण्यावरून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. रागात येऊन इतरांना नुकसान पोहोचवायचे आणि वाहतुकीचे नियम तोडायचे हा प्रकार सर्रास सुरू आहे. तर आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये दिल्लीतील एका उद्योजकाने भरदिवसा त्याच्याबरोबर घडलेल्या रोड-रेज हल्ल्याचा एक भयानक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हायरल पोस्ट तुषार गुप्ता यांनी शेअर केली आहे. गुरुवारी सकाळी कामावर जात असताना दिल्लीतील एका उद्योजकाबरोबर एक भयानक घटना घडली आहे. एका दुचाकीस्वाराने तुषारचा जवळजवळ तीन किलोमीटर पाठलाग करून गाडीवर विटांनी हल्ला केला, ज्यामुळे तो रक्तबंबाळ झाला आहे. सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा एका अज्ञात व्यक्तीने तुषार गुप्ताच्या गाडीचा पाठलाग सुरू केला आणि गाडीतून बाहेर येण्यास तो वारंवार सांगत राहिला. परंतु, तुषार थांबला नाही आणि त्यामुळे तो जास्त रागावला.
तुटलेल्या खिडक्या आणि गाडीच्या आत रक्ताचे डाग (Viral Photo)
रस्त्यावर गर्दी असल्यामुळे तुषार गाडी हळू चालवत होता. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने गुप्ता यांच्या गाडीला ओव्हरटेक केले, त्यांचा मार्ग अडवला आणि ड्रायव्हरच्या बाजूची खिडकी, रिअर व्ह्यु मिरर तोडण्यास सुरुवात केली. त्या माणसाने रस्त्याच्या कडेला असलेली एक वीट उचलली, मागची काच फोडली आणि नंतर पुढच्या दोन्ही सीटच्या खिडक्या तोडण्यासाठी तो पुन्हा आला. काही मिनिटांतच त्याने विटांचा वापर करून पुढच्या सीटच्या दोन्ही खिडक्या फोडल्या होत्या.
पोस्ट नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो @Tushar15_ या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. गाडीमध्ये बसलेल्या तुषारच्या संपूर्ण शरीरावर काचेचे तुकडे पडले होते. तुषारने शेअर केलेल्या व्हायरल फोटोमध्ये तुटलेल्या खिडक्या, फुटलेली विंडशील्ड आणि गाडीच्या आत रक्ताचे डाग, हल्ल्यादरम्यान झालेल्या जखमा दिसत आहेत; हे फोटोद्वारे दाखवीत त्याने पोस्ट शेअर केली आहे. हल्ल्यानंतर तुषार गुप्ता यांनी आपत्कालीन सेवांना फोन केला आणि पोलिस आणि वाहतूक विभागाला हल्लेखोराचा शोध घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर एक तासाच्या आतमध्ये पोलिसांनी येऊन तपास सुरू केला.