Elephants viral vide: जंगलातील प्राणी आणि मानव यांच्यातील संबंध नेहमीच गूढ आणि भावनिक राहिले आहेत. ‘हाथी मेरे साथी’सारख्या चित्रपटांनी या नात्याचं सुंदर चित्रण केलं असलं, तरी खऱ्या आयुष्यातही अशी उदाहरणं पाहायला मिळतात, जिथं माणसाच्या प्रेमळ शब्दांना प्राणी प्रतिसाद देतात. असंच एक हृदयस्पर्शी दृश्य छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात पाहायला मिळालं, जिथं एका वन कर्मचाऱ्याने हत्तींच्या कळपाशी संवाद साधत त्यांना रस्ता सोडून जंगलात परत जाण्यास सांगितलं आणि विशेष म्हणजे हत्तींच्या कळपाने त्याचे म्हणणे ऐकले.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रायगड जिल्ह्यातील छल वनपरिक्षेत्रातील गद्दैनबहरी आणि औरनार गावांच्या परिसरात ही घटना घडली. जंगलातून बाहेर आलेला हत्तींचा कळप अचानक रस्त्यावर आला होता. याचवेळी तिथून जात असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिलं आणि शांतपणे त्यांच्याशी संवाद साधत जंगलाच्या दिशेनं जायला सांगितलं.

व्हिडीओमध्ये एका वनरक्षकाला हत्तींकडे पाहून असे म्हणताना ऐकू येते -“चला, चला… रस्त्यात उभे राहू नका, तुम्ही गुणी मुलं आहात ना मग, जंगलात जा.” हा प्रेमळ आवाज ऐकून हत्तींचा संपूर्ण कळप वळून जंगलाच्या दिशेनं चालू लागतो. फक्त एक हत्ती रस्त्यावर क्षणभर थांबतो आणि वनरक्षकाकडे पाहतो, जणू काही तो निरोप घेत आहे. हा क्षण लोकांच्या हृदयाला स्पर्श करतो आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आणतो.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हटलं, “हे दृश्य मानवता जिवंत असल्याचं उदाहरण आहे.” तर दुसऱ्याने लिहिलं – “प्रेम आणि शांततेनं बोललं तर वन्य प्राणीसुद्धा समजून घेतात.” अनेकांनी वनकर्मचाऱ्याचं कौतुक केलं आणि त्याला “रियल लाइफ हाथी मेरे साथी” असं संबोधलं. काहींनी लिहिलं की, “ही आहे खरी पर्यावरणाची समज – आदर आणि सहअस्तित्व.”

या व्हिडीओनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की, जंगलातील प्राणी फक्त शक्तिशालीच नाहीत तर संवेदनशीलही असतात आणि माणसाने जर प्रेम, संयम आणि सन्मानाने त्यांच्याशी वागलं, तर नातं भितीचं नव्हे तर विश्वासाचंही असू शकतं.