Viral Video Girl Scolded By Mother : आईबरोबर तिच्या मुलांची छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण होतच असतात. पण, भांडण झाल्यावर बोलायचं सोडून देणे, घरातील इतर सदस्यांच्या सहाय्याने एकमेकांशी संवाद साधणे, घरी न जेवणे आदी अनेक गोष्टी आपल्यातील अनेक जण आजवर नक्कीच करून झाले असणार. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जो पाहून तुम्ही पहिला थक्क व्हाल आणि कारण वाचून एका क्षणासाठी तुम्हाला हसू सुद्धा येईल एवढे तर नक्की…

सध्या सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आहे. काल दिवाळी पहाट झाली तर आज लक्ष्मीपूजन असणार आहे. दिवाळीपूर्वी आपण सगळेच घराची साफसफाई करतो. यादरम्यान आई सर्वांना काम सोपवते आणि जे साफसफाई करत नाहीत त्यांना कडक शब्दांत फटकारते. तर आज असेच काहीसे व्हायरल व्हिडीओत घडले. दिवाळीच्या साफसफाईत लेकीने मदत न केल्यामुळे आई तिला ओरडली. मग रागात मुलगी घरातून बाहेर निघाली आणि मोबाईल टॉवरवर चढली आहे.

स्थानिकांनी आईला ठरवले दोषी (Viral Video)

व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील आहे. मिर्झापूर जिल्ह्यातील कच्छवा पोलीस स्टेशन हद्दीतील देह गावात ही विचित्र घटना घडली. आईने साफसफाई करण्यास सांगितले होते. पण, मुलीने नकार दिला आणि जेव्हा आईने तिला फटकारले तेव्हा ती रागाच्या भरात मोबाईल टॉवरवर चढली. गावकऱ्यांनी मुलीला टॉवरवर पाहिले तेव्हा त्यांनी ताबडतोब तिच्या कुटुंबाला आणि पोलिसांना कळवले. काही वेळातच पोलिस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. समजूत काढल्यानंतर, मुलीला शांत करण्यात आले आणि सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @Bhupend29375158 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक या प्रकरणावर म्हणाले की, मुलीला तिच्या आईने साफसफाईची कामे सोपवल्याचा राग आला होता. कुटुंबातील इतर सदस्यही होते. पण, आईने तिच्या भावाला साफसफाई करायला न सांगता लेकीला सांगितले; ज्यामुळे तिला राग आला. नंतर मुलीला सुरक्षितपणे घरी परत आणण्यात आले असे सांगण्यात येत आहे.