आजच्या सोशल मीडियाच्या युगात रील बनवण्याचं वेड किती धोकादायक ठरू शकतं, याचं एक उदाहरण सध्या सर्वत्र चर्चेत आहे. प्रसिद्धीच्या काही सेकंदांसाठी लोक आपलं आयुष्य धोक्यात घालतात, हे पाहून अनेकांना धक्का बसतो. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुणी धावत्या रेल्वेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. ही घटना पाहून लोकांनी तिला चांगलेच सुनावले आहे आणि रेल्वे प्रशासनानेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.
हा व्हिडीओ एका रेल्वेस्थानकाजवळ शूट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ट्विटर या प्लॅटफॉर्मवर पोस्ट झालेल्या या व्हिडीओत एक तरुणी रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळ उभी राहून रेल्वेला स्पर्श करताना दिसते. रेल्वे येण्याच्या थोड्याच वेळ आधी ती कॅमेऱ्यासमोर पोझ देते आणि अचानक धावत्या रेल्वेकडे हात पुढे करते.
रेल्वेचा वेग वाढवताच, ती धाडसाने तिचा हात पुढे करते आणि रेल्वेच्या दाराशी बसलेला एक तरुण तिच्या हातावर थाप मारतो, म्हणजेच “तिला टाळी देतो.” हे पाहून ती मुलगी हसते, पण काही सेकंदांतच रेल्वे तिच्या अगदी जवळून धडधडत जाते. गाडीच्या वेगामुळे निर्माण झालेल्या वाऱ्याच्या झोतामुळे ती मागे ढकलली जाते आणि जवळजवळ तिचा तोल जातो. सुदैवाने ती वाचली, पण थोडीशी चूक झाली असती तर मोठा अपघात घडला असता.
पाहा व्हिडिओ
हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “रीलच्या प्रसिद्धीमुळे लोकांची अक्कलच हरवली आहे.” तर दुसऱ्याने म्हटलं, “या पिढीला फक्त फेम हवा आहे, मग जीव गेला तरी चालेल.” अनेकांनी तर अशा व्हिडीओ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. काहींनी तर थेट रेल्वे प्रशासनाला टॅग करून लिहिलं की, अशा प्रकारचं शूटिंग करणाऱ्यांना दंड आणि तुरुंगवास दोन्ही शिक्षा द्यायला हव्यात.
रेल्वे प्रशासनाकडूनही वारंवार सूचना दिल्या जातात की ट्रॅकजवळ, प्लॅटफॉर्मवर किंवा धोकादायक ठिकाणी रील बनवणं हे केवळ नियमभंग नाही, तर जीवावर बेतणारं असतं. तरीही काही जण प्रसिद्धीच्या नादात अशा गोष्टी करून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालतात.
ही घटना पुन्हा एकदा दाखवते की, “रील कल्चर”चं वेड किती भयानक रूप धारण करतंय. काही सेकंदांच्या व्हायरल व्हिडीओसाठी लोक आयुष्याशी खेळ करतायत, हे पाहून समाजालाच विचार करावा लागेल, प्रसिद्धी महत्त्वाची की जीव?
