Viral Video Railway Phone Theft: डिजिटल युगात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रेल्वे प्रवासात मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. अशा घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि प्रवाशांना सावध करण्यासाठी एका भारतीय रेल्वे पोलिसाने अनोखी पद्धत अवलंबली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोक या ‘प्रॅक्टिकल अवेअरनेस’ उपक्रमाचं कौतुक करीत आहेत.

त्याच बाबतीत सध्या सोशल मीडियावर एका रेल्वे पोलिसाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसाने अतिशय वेगळ्या पद्धतीने लोकांना ट्रेनमध्ये होणाऱ्या मोबाईल चोरीबद्दल जागरूक केलं आहे. लोकांच्या दैनंदिन प्रवासात घडणाऱ्या अशा छोट्या; पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न अनेकांना आवडला आहे.

हा व्हिडीओ रेल्वेस्थानकावरचा असून, त्यात रेल्वे पोलीस प्रवाशांना कसे मोबाईल फोन ट्रेनच्या खिडकीतून चोरी होतात हे प्रत्यक्ष दाखवून देत आहेत. या व्हिडीओचा उद्देश म्हणजे प्रवाशांनी आपल्या मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, खिडकीजवळ ठेवू नयेत आणि सतर्क राहावे, असा संदेश देणे असा आहे.

पाहा व्हिडिओ

२३ सेकंदांच्या या क्लिपमध्ये रेल्वे पोलीस एका महिला प्रवाशाशी संवाद साधताना दिसतात. ती महिला खिडकीजवळ बसलेली असते आणि तिचा मोबाईल खिडकीच्या चौकटीवर ठेवलेला असतो. पोलीस तिच्या मोबाईलकडे हात लावून दाखवतात की, अशा प्रकारे चोर मोबाईल उचलून पळवू शकतात. महिला सुरुवातीला थोडी दचकते; पण लगेच हसते आणि पोलिसांच्या सूचना समजून घेते. व्हिडीओमध्ये ‘जागरूकता पसरवण्याचा प्रभावी मार्ग’ अशी कॅप्शन त्याला दिली आहे.

हा व्हिडिओ @sathyashri या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात पाहिली आहे.”या व्हिडीओला आतापर्यंत साडेसात लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाले आहेत. पोलिसांच्या या ‘व्यावहारिक’ दृष्टिकोनाचे युजर्सनी कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले, “अशाच प्रकारे लोकांना समजतं.” तर दुसऱ्याने लिहिले, “पोलिसांचे उत्तम काम – सिद्धांतापेक्षा व्यावहारिक अधिक प्रभावी.” काहींनी तर “त्या महिलेला मिनी हार्ट अटॅक आला असेल”, अशी मजेशीर कमेंटही केली.अशा उपक्रमांमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण होते आणि चोरीसारख्या गुन्ह्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यास मदत मिळते.