School Peon Viral Video : आजही शाळेसमोरून गेलो की, बऱ्याच गोष्टी आठवतात. जुन्या मित्र-मैत्रिणी, शाळेतला बाक आणि शाळेतील ती घंटा. शाळेच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी ही घंटा वाजल्यावर वेगवेगळ्या भावना मनात दाटून यायच्या. पहिल्या दिवशी अनोळखी लोकांमध्ये जाण्याची भीती; तर शेवटच्या दिवशी शाळा सोडण्याचे दुःख मनात असायचे. तर आज सोशल मीडियावर शाळेतील घंटा वाजवणाऱ्या शिपाईकाकांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतील शिपाईकाकांचा खास सन्मान केला आहे.

३८ वर्षांच्या सेवेनंतर शाळेतील शिपाई एकदा शेवटची घंटा वाजवतानाचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या भावनिक क्षणी सगळे विद्यार्थी मिळून त्यांचा उत्साह वाढवताना जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. शिपाईकाका शाळेच्या घंटेजवळ येतात आणि घड्याळात वेळ पाहत असतात आणि मागून सगळे विद्यार्थी काउंटडाऊन सुरू करतात. त्यानंतर मग शिपाईकाका शाळेची घंटा वाजवतात आणि विद्यार्थी जोरजोरात टाळ्या वाजवायला सुरुवात करतात.

…म्हणूनच त्यांना आज असा सन्मान मिळतोय (Viral Video)

शाळेतील एका विद्यार्थिनीने या क्षणाचा व्हिडीओ रेकॉर्ड करून पोस्ट केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ३८ वर्षांनंतर दासकाकांनी शेवटची घंटा वाजवली. ही तीच व्यक्ती आहे, ज्यांच्यामुळे शाळेतील घंटेनं प्रत्येक सकाळ आणि प्रत्येक आठवण ‘कॉटन’ शाळेसाठी खास बनवली. त्यांचा हसरा चेहरा, शांतपणे केलेली निष्ठावान सेवा आणि त्यांची उपस्थिती हे सगळं शाळेच्या जीवनाचा एक भाग होते. आज त्यांनी शेवटची घंटा वाजवली आणि आम्ही त्यांचा सन्मान केला. दासकाका, ज्यांनी नेहमीच आपुलकीची भावना दिली.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @amikutty_ या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि आतापर्यंत त्याला १.५७ कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तसेच व्हिडीओ पाहून नेटकरी “शाळा व्यवस्थापन आणि सर्व शाळेतील मुलांचे त्याच्यासाठी हा दिवस खूप खास बनवल्याबद्दल त्यांचे आभार”, “हे बघून आपसूकच रडू आले”, “आजकालच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे गोष्टी शिकवल्या जातात, जेणेकरून मुले लोकांचा आदर करायला शिकतील”, “खूप सुंदर व्हिडीओ! विचार करा, त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी किती काही दिलं असेल. म्हणूनच त्यांना आज असा सन्मान मिळतोय” आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.