Tree Cutting Viral Video : वस्तू, प्राणी असो किंवा अगदी एखादी व्यक्ती त्यांच्याबरोबर भावना जोडल्या की, एक अनोखं नातं तयार होतं. मग आपण त्यांचा सांभाळ करतो, त्यांच्याबरोबर वेळ घालवतो… त्यामुळे हे नातं आणखी घट्ट होऊन जातं. पण, जेव्हा ही प्रिय गोष्ट आपल्याला सोडून जाते. तेव्हा आपल्याला काय बोलावं कळेनासं होतं आणि मग शेवटी डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहत नाही. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील आहे. इथे घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण गावात संताप आणि दुःखाची लाट पसरली. एका महिलेनं २० वर्षांपूर्वी पिंपळाचं झाड लावलं होतं, ते झाड कापलं गेलं म्हणून झाडाजवळ रडत होती. महिला त्या झाडाला स्वतःच्या मुलासारखं वागवत होती. दररोज त्याला पाणी घालायची, पूजा करायची. पण, एवढ्या वर्षांनी जेव्हा झाड तोडण्यात आलं तेव्हा मात्र तिच्या अश्रूंचा बांध फुटला. महिलेला रडताना पाहून आमचं हृदय तुटलं,” असे सुरेश कुमार तिवारी या गावकऱ्यानं इंडिया टुडेला सांगितलं.

या घटनेमुळे रहिवासी संतप्त झाले आहेत. त्यांचा आरोप आहे की, स्थानिक जमीन विक्रेता इम्रान मेमनच्या सांगण्यावरून हे झाड तोडण्यात आलं. त्यांचा दावा आहे की, हे झाड सरकारी जमिनीवर होतं. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इम्राननं त्याचा एका सहकारी प्रकाश कोसारे याच्याबरोबर मिळून झाड तोडण्याचा कट रचला. त्यामुळे ग्रामस्थांनी मिळून सरगोंडीचे माजी सरपंच सुरेश कुमार तिवारी आणि संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली खैरागड पोलिस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी केली.

व्हिडीओ नक्की बघा…

अश्रूंचा हिशोब निसर्ग घेणारं एवढं नक्की (Viral Video)

ग्रामस्थ प्रमोद पटेल यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम २९८ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा क्रमांक ४६४/२०२५ नोंदवला आणि तपास सुरू केला. चौकशीदरम्यान, ते झाड इम्रान मेमननं त्याच्या खरेदी केलेल्या फ्लॅटसमोर होतं. त्याला जमीन सपाट करायची होती. प्रकाशनं त्याला मदत केली आणि लाकूड कापण्याच्या मशीननं ते झाड तोडलं. त्या प्रसंगी इम्रान जवळ उभा राहून पाहत होता.

महिलेसाठी “हे फक्त एक झाड नव्हतं, तर श्रद्धा आणि गावाच्या भक्तीचंही प्रतीक होतं. त्यामुळे झाड तोडणं म्हणजे सगळ्यांसाठी भावनिक धक्का होता,” असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच या घटनेनंतर, गावकऱ्यांनी त्याच ठिकाणी एक नवीन पिंपळाचं झाड लावलं आहे आणि त्याचं संरक्षण करण्याचं वचन दिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @maharashtraofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून “त्या माऊलीच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब निसर्ग घेणार एवढं नक्की”, “एका झाडाला आपल्या लेकराप्रमाणे वाढवणाऱ्या माऊलीला माझा सलाम”, “ते फक्त झाड नाही, तर त्याबरोबर भावनाही जोडलेल्या असतात” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.