भारत हा असा एक देश आहे जेथे प्रत्येक जाती, धर्माचे लोक राहतात. त्यामुळे येथे प्रत्येक धर्माचे सण, उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जातात. विशेष म्हणजे प्रत्येक धर्माचे लोक अन्य धर्मीयांच्या सण,उत्सवांमध्येही तेवढ्याच आनंदाने सहभागी होतात. याच सर्वधर्म समभावाचा प्रत्यय नुकताच मुंबईमध्ये आला आहे.

नवरात्र म्हटलं की देवीची आरास आणि गरबा हे ठरलेलं समीकरण. त्यामुळे या दिवसांमध्ये ठिकठिकाणी गरब्याचं आयोजन केलं जातं. बदलत्या काळानुसार गरब्यामध्ये पारंपरिकता जपत त्याला आधुनिकतेची जोड दिल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे गरब्याच्या ठिकाणी हमखास तरुणाईची गर्दी दिसून येते. यात तरुण-तरुणीने परिधान केलेला पेहराव, आभूषणे आणि त्यांची गरब्याची स्टाईल या साऱ्यांची चर्चा होत असते. परंतु मुंबईतील एक गरबा या तरुणाईमुळे नव्हे तर एका ख्रिश्चन पाद्री यांच्यामुळे चर्चेत आला आहे.

मुंबईतील माटुंगा येथील डॉन बॉस्को शाळेच्या मैदानावर गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात चक्क एक पाद्रींनी सहभाग घेतला असून ते गरबा खेळण्यात दंग असल्याचं दिसून आलं. गरबा खेळण्यात मग्न असलेल्या पाद्रींचं नाव फादर क्रिसपीनो डिसूजा असं आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा व्हिडिओ सुरेंद्र शेट्टी या व्यक्तीने शेअर केला असून सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यापूर्वीदेखील गरब्याचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांनी केलेल्या गरब्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. गरबा खेळणाऱ्या या महिलांचा व्हिडिओ केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी शेअर केला होता.