विमानातून प्रवास करून परदेशात जायचं असेल तर पासपोर्ट अगदीच महत्वाचा असतो. याच्या आधारावर आपल्याला व्हिसाही मिळतो. यासाठी लोक पासपोर्ट अतिशय जपून ठेवतात. कारण पासपोर्ट बनवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला तितका खर्चही करावा लागतो. तर आज सोशल मीडियावर पासपोर्ट संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही चकित व्हाल. एक वृद्ध व्यक्ती पासपोर्ट नूतनीकरणसाठी पासपोर्टच्या कार्यालयात पोहचते. पण, कर्मचारी जेव्हा पासपोर्ट बघतात तेव्हा वृद्ध आणि कर्मचारी पासपोर्टवर लिहिलेलं पाहून हैराण होतात.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ पासपोर्टच्या कार्यालयातील आहे. कर्मचारी वृद्ध व्यक्तीचा पासपोर्ट हातात घेऊन तो उघडतो. पासपोर्ट उघडताच सुरुवातीच्या पानावर व्यक्तीचा फोटो आणि त्याची माहिती असते. त्यानंतर पासपोर्ट चेक करणारा कर्मचारी जेव्हा पुढे पुढे बघतो तेव्हा पानांवर अज्ञात व्यक्तींची नावं आणि फोन नंबर लिहिलेले असतात. तसेच एक नाही, दोन नाही तर अगदी बऱ्याच पानांवर नंबर लिहिण्यात आले आहेत. वृद्ध व्यक्तीच्या घरातील काही लोकांनी या पासपोर्टवर घरातील डायरी समजून हिशोब आणि नंबर लिहिले आहेत… कशाप्रमाणे महत्वाच्या पासपोर्टचा वापर फोन नंबर लिहिण्यासाठी केला आहे ते एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून नक्की बघा…
हेही वाचा…छोले-भटुरे हातात घेऊन लिफ्टमध्ये अडकल्या तीन व्यक्ती! मदतीसाठी आले रहिवासी अन्… मजेशीर Video व्हायरल
व्हिडीओ नक्की बघा :
पासपोर्टला बनवलं घरगुती डायरी :
सुरुवातीला मोबाइल फोनचा जास्त वापर होत नव्हता, तेव्हा आपल्यातील बरेच जण फोन नंबर आणि घरातील हिशोब एका डायरीमध्ये लिहून काढायचे. तर या व्हिडीओतसुद्धा असंच पहायला मिळालं आहे. पासपोर्ट चेक करणारा कर्मचारी जेव्हा पासपोर्ट उघडतो, तेव्हा त्याला फोन नंबर आणि नावं लिहिलेली दिसतात. तर पासपोर्टच्या शेवटी हिशोब आणि काही पानांवर बेरीज,वजाबाकी केलेली दिसते आहे. आपल्या एवढ्या महत्वाच्या वस्तूचा वृद्ध व्यक्तीच्या घरातील लोकांनी अगदीच चुकीचा वापर केला याची त्यांना जाणीवसुद्धा नसते.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Dprashantnair यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या पोस्टला “एका वृद्ध गृहस्थाने आपला पासपोर्ट नूतनीकरणासाठी जमा केला. त्यांच्या घरातील कोणीतरी त्यांच्या पासपोर्टवर काय लिहिलं याचे त्यांना भान नव्हते”; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून अनेक जण मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत.