ट्विटरवर रोज नवीन वाद होत असतात, नवनवीन ट्रेंड व्हायरल होत असतात. सध्या स्टारबक्सची जाहिरात तुफान चर्चेच आहे. ही जाहिरात पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स दोन गटांत विभागले गेले आहेत. काहींनी या जाहिरातीचे समर्थन केले आहे तर काहींनी विरोध करत त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान ट्विटरवर #BoycottStarbucks हा हॅशटॅग खूप ट्रेंड होत आहे. नक्की या जाहिरातीमध्ये असे काय दाखविण्यात आले आहे ज्यावर इतकी चर्चा सुरू आहे? चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण.
काय आहे जाहिरात?
या जाहिरातीमध्ये ‘स्टारबक्सच्या कॉफी शॉपमध्ये आई-वडील आपल्या मुलीची वाट पाहत आहेत. मुलीचे नाव अर्पिता आहे जे आधी अर्पित असे होते. अर्पितने लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया केली आहे. अशा परिस्थितीत वडील याबाबत नाखूश दिसत आहेत, पण जेव्हा वडील अर्पिता नावाने कॉफीची ऑर्डर देतात तेव्हा तिला समजते की, त्यांनीही हे सत्य स्वीकारले आहे. त्यानंतर जाहिरातीमध्ये वडील मुलीला म्हणतात, “तू कोणीही असलीस तरी माझ्यासाठी माझं मूलंच राहशील ना. तुझ्या नावात फक्त एक अक्षरच तर जोडलं आहे.”
हेही वाचा – Viral Video : मँगो पिझ्झानंतर आता आला ‘बनाना पिझ्झा’, विचित्र प्रयोग पाहून संतापले लोक
सामाजिक संदेश देणारी जाहिरात
तुम्ही जसे आहात तसेच स्वत:ला स्वीकारा, असा या जाहिरातीचा उद्देश आहे. एक प्रकारे हा सामाजिक संदेश देणारी जाहिरात आहे जी कित्येक लोकांना आवडत आहे. तर कित्येक लोक तिला विरोध करत आहेत.
जाहिरातीतून तृतीयपंथीयांच्या हक्कांचे केले समर्थन
स्टारबक्स ही देशातील प्रतिष्ठित कंपनी आहे, ज्यांची ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तृतीयपंथीयांच्या हक्कांचे समर्थन करणारी ही जाहिरात आहे. पण, काही काळातच ही जाहिरात वादात अडकली. स्टारबक्सने ट्विटरवर व्हिडीओसोबत कॅप्शन लिहले आहे, ‘तुम्ही अर्पित असा किंवा अर्पिता, आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमचा आदर आणि स्वीकार करू.
हेही वाचा – मॅकडॉनल्डच्या खाद्यपदार्थामुळे ४ वर्षीय मुलीला चटका बसल्याचा पालकांचा दावा, मागितली ‘एवढी’ नुकसानभरपाई
जाहिरातीवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ आठ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर कित्येक लोकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. एकाने लिहिले आहे की, “वडिलांची मन:स्थिती समजू शकतो. स्टारबक्सने चांगली जाहिरात केली आहे.” तर काही लोकांनी या जाहिरातीवर टीका करत स्टारबक्सला बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सुरू केला आहे.
तुम्हाला ही जाहिरात कशी वाटली नक्की कळवा.