scorecardresearch

जगातली सर्वात कंटाळवाणी व्यक्ती कोण असेल माहितीये? नव्या संशोधनातील दाव्यानुसार…!

तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण या संधोनाच्या निष्कर्षांनुसार ‘झोपणे’ हा जगातला सर्वात कंटाळवाणा छंद आहे!

worlds most boring person
जगातली सर्वात कंटाळवाणी व्यक्ती कोण असेल, याविषयी एका संशोधनात दावा करण्यात आला आहे.

ही बातमी वाचलेल्या, वाचत असलेल्या आणि न वाचलेल्या अशा जवळपास सगळ्यांनाच कधी ना कधीतरी आपण करत असलेल्या कामाचा, नोकरीचा किंवा जबाबदारीचा कंटाळा आलेलाच असावा. पण याचा अर्थ आपल्यासाठी ते काम कंटाळवाणं असतं असा मात्र मुळीच नाही. पण तुम्हाला माहितीये का, की असं एक अजब संशोधन झालं आहे, ज्यामध्ये जगातली सगळ्यात कंटाळवाणी व्यक्ती कोण असेल, याविषयी एक निष्कर्ष काढण्यात आला आहे? मुळात कोणत्याही गोष्टीत रस असणं किंवा नसणं ही पूर्णपणे वैयक्तिक बाब असताना एखादं काम कंटाळवाणं आहे असं कुणी कसं म्हणू शकेल?

अर्थात, हे वास्तव गृहीत धरूनच कोणत्याही हे कामाला संशोधन करणाऱ्या संशोधकांनी कंटाळवाणं न म्हणता इतरांना विशिष्ट प्रकारच्या कामाविषयी काय वाटतं, ते करणाऱ्या व्यक्तींविषयी काय वाटतं, या आधारावर हे संशोधन करण्यात आलं आहे. आणि यातून काही भन्नाट दावे संशोधकांकडून करण्यात आले आहेत. अर्थात, यातून हे काम कंटाळवाणंच असेल, असं सत्य मांडण्याचा प्रयत्न नसून इतरांना ही विशिष्ट प्रकारची कामं किंवा ते करणाऱ्या व्यक्ती कंटाळवाण्या वाटतात, असा काहीसा निष्कर्ष या संशोधनातून मांडण्यात आला आहे.

हे अजब संशोधन केलंय कुणी?

तर या प्रश्नाचं उत्तर आहे युनिव्हर्सिटी ऑफ इस्सेक्सच्या मानसशास्त्र विभागानं हे आगळं-वेगळं संशोधन केलं आहे. या विद्यापीठातील डॉ. विजनँड व्हॅन टिलबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन झालं असून त्यातून अशी कामं करणाऱ्या व्यक्तींकडे बघण्याचा किंवा त्यांच्याशी वागण्या-बोलण्याचा दृष्टीकोन इतरांनी बदलायला हवा, असा एक सकारात्मक संदेश देखील डॉ. टिलबर्ग द्यायला विसरले नाहीत. यासंदर्भात युनिव्हर्सिटी ऑफ इस्सेक्सनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

कंटाळवाण्या कामांचा अभ्यास केला कसा?

डॉ. टिलबर्ग यांनी जवळपास ५०० व्यक्तींच्या राहणीमानाचा, त्यांच्या विचारसरणीचा, त्यांच्या वागण्या-बोलण्याचा, त्यांच्या आवडी-निवडींचा अगदी सविस्तर अभ्यास केला. या व्यक्ती करत असलेल्या कामांविषयी इतरांचं नेमकं मत काय? त्यांना त्यातली कोणती कामं वा व्यक्ती कंटाळवाणी वाटतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतरांच्या या वाटण्याचा अशा व्यक्तींवर काय परिणाम होतो? अशा प्रश्नांचा आढावा या संशोधनात घेतला गेला.

ही कामं नक्की आहेत तरी कोणती?

आता एवढा सगळा खटाटोप केल्यानंतर संशोधकांच्या चमूनं अशा काही कामांची यादी बनवली, जी कंटाळवाणी म्हणून अभ्यासातून पुढे आली. यामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत क्रम लावायचा झाल्यास सर्वात आधी डाटा एंट्री, त्यापाठोपाठ अकाउंटिंग, त्यानंतर इन्शुरन्स, मग स्वच्छता, बँकिंग आणि सहाव्या स्थानी क्लार्कचं काम हे कंटाळवाण्या कामांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं.

एखादी डाटा एंट्रीचं काम करणारी, शहरात राहणारी व्यक्ती जिचा सर्वाच आवडता छंद हा टीव्ही बघणे आहे, अशी व्यक्ती कंटाळवाणी असू शकते, असा निष्कर्ष या अभ्यासात मांडण्यात आला आहे. पण यासोबतच, अशी कामं करणाऱ्या व्यक्तींसोबत वागण्याच्या पद्धती सुधारण्याविषयी देखील संशोधकांनी निष्कर्षात निरीक्षण मांडलं आहे. अशा व्यक्ती मुख्य प्रवाहातून बाजूला पडून त्यांना मानसिक त्रास होण्याचा संभव असल्याचं अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. ही कामं देखील समाजातल्या इतर कामांइतकीच महत्त्वाची असल्यामुळे त्यांना योग्य तो मान दिला जाणं आवश्यक असल्याचं देखील संशोधन करणारे डॉ. टिलबर्ग यांनी नमूद केलं आहे.

सर्वात कंटाळवाणे छंद कोणते?

या संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, झोपणे हा सर्वात कंटाळवाणा छंद आहे. त्यापाठोपाठ धार्मिक गोष्टी, मग टीव्ही बघणे, नंतर पक्षीनिरीक्षण, गणित आणि शेवटी कायदेशीर बाबी असा क्रम लावण्यात आला आहे.

मग सर्वाधिक इंटरेस्टिंग कामं कोणती?

आता सर्वात कंटाळवाणी कामं काढल्यानंतर सर्वात इंटरेस्टिंग कामं देखील काढायलाच हवीत ना? त्यासंदर्भात देखील संधोधनात आढावा घेण्यात आला असून कलेशी संबंधित काम हे सर्वात इंटरेस्टिंग मानण्यात आलं आहे. त्यानंतर विज्ञान, पत्रकारिता, आरोग्य सेवक आणि शेवटी शिक्षक असा इंटरेस्टिंग कामांचा क्रम लावण्यात आला आहे.

पण अर्थात, एका संशोधनातून हे निष्कर्ष काढण्यात आले असले, तरी व्यापक स्तरावर प्रत्येकाचे वैयक्तिक अनुभव वेगळे असण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. या बाबतीत तुमचा अनुभव काय सांगतो?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Worlds most boring person could be from data entry worker watching tv as hobby pmw

ताज्या बातम्या