संकटकाळात तरी सरकारे समंजसपणे वागतात व सुज्ञ निर्णय घेतात असा समज करून घ्यायला आता काही हरकत नसावी. गेले तीन आठवडे दहावीच्या भूगोलामुळे राज्यातल्या लाखो पालकांच्या घशांत आवंढा अडकला होता. तो सरकारने एका झटक्यात दूर केला. या निर्णयामुळे आता तमाम पालक व परीक्षार्थी करोनाविषयक बातम्यांच्या रतीबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोकळे झाले. खरे तर काही दिवस ही मंडळी करोनाच्या निमित्ताने जगभरचा भूगोलच समजून घेत होती. एरवी आपल्याकडे माध्यमातले देशविदेशचे पान बघण्यात कुणाला रस नसतो. आता मात्र स्थिती पूर्ण बदललेली. अमेरिके त काय सुरू आहे, स्पेनमध्ये किती गेले, इटलीत काय झाले, दक्षिण कोरियाच्या एवढय़ा बातम्या येतात, मग उत्तर कोरियाच्या का नाही; जर्मनीत कसे चांगले घडतेय, ब्रिटनच्या पंतप्रधानांची तब्येत कशी आहे, याचीच चर्चा घराघरात! तिथले राज्यकर्ते, तिथल्या मृत्यूच्या करुण कहाण्या, तिथल्या लेखकांची भावगर्भ पत्रे व त्याच्या वाचनाची इत्थंभूत माहिती सर्वाच्या तोंडी खेळू लागली आहे. कारण एकच करोना नावाची महामारी. संकटकाळी तमाम नागरिकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या सरकारच्या लक्षात आले. अरे, हाच तर भूगोलाचा खरा अभ्यास! त्यात आता विद्यार्थीच नाही तर पालकही पारंगत झालेले. अशा वेळी परीक्षेचा अट्टहास पुढे रेटला तर पैकीच्या पैकी गुण मिळवणारे शेकडय़ाने असतील. त्यापेक्षा परीक्षाच न घेतलेली बरी. हाच बरे सरकारचा सुज्ञ विचार. भूगोल म्हणजे जलावरण, स्थलावरण व वातावरण या तीन आवरणांचा अभ्यास करणे. सध्या करोनामुळे घराघरात यावर अभ्यास सुरू आहेच. किती तापमानात हा विषाणू जिवंत राहतो, के व्हा मरतो, मग जिथे साथ आहे तिथले तापमान किती, समुद्राची लांबी किती याची आकडेवारी प्रत्येक कुटुंबात चर्चिली जात आहे. प्रत्येक घरात इंटरनेटवर जगाचे नकाशे उघडले जाताहेत आणि भूगोलतज्ज्ञांची फौजच तयार होते आहे हे सरकारच्या ध्यानी येण्यास अंमळ उशीरच झाला. सध्या भूगोलविश्वात तीन प्रकारचे वाद चर्चिले जातात. संभववाद म्हणजे मानवी बुद्धीने निसर्गावर मात करता येणे शक्य आहे. निसर्गवाद व नवनिसर्गवाद म्हणजे निसर्गाशी तडजोड करावी,  आपण जगावे व इतरांनाही जगू द्यावे असे या वादात अभिप्रेत आहे. करोनाच्या निमित्ताने घराघरात यावर झडणाऱ्या चर्चा कोणत्याही भूगोलतज्ज्ञाला लाजवेल अशाच आहेत. निसर्गाची काळजी के ली असती, त्यातील बदलाची वेळीच दखल घेतली असती तर करोनाच काय, पण कोणत्याही संकटावर मात करता आली असती, असे दावे वाचणाऱ्या, बघणाऱ्यांचीही संख्या आता वाढली आहे. तेव्हा लेखी परीक्षेपेक्षा प्रत्यक्ष अनुभवातूनच विद्यार्थी भूगोल समजून घेत असतील तर परीक्षेची काय मातबरी? कोणतेही औषध नसलेली एक साथीच्या आजाराची लाट काय काय बदल घडवून आणत आहे याचा विलक्षण अनुभव सध्या सारेच घेत आहेत. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना आलेला अनुभव आयुष्यभर विसरता येणे शक्य नाही. त्यासाठी त्यांनी थाळी वाजवून वा दिवे घालवून सरकारचे अभिनंदन करण्याची अजिबात गरज नाही. ते करायला सांगण्यासाठी राज्यकर्ते मोकळे आहेत.