महसुलाच्या चिखलात राहूनही सुस्वच्छ राहिलेले भाजपचे एक कमळ म्हणजे खान्देशवीर एकनाथजी खडसे. त्यांनी जेव्हा अत्यंत बाणेदारपणे नाही नाही म्हणत अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला, तेव्हा मंत्रालयाच्या इमारतीपासून सह्य़ाद्रीच्या कडेकपारींपर्यंत अवघा महाराष्ट्र हळहळला होता. ती वेदनाच तेवढी प्रचंड होती. एखाद्याचे साधेसे मंत्रिपद गेले तरी ते दु:ख महासागराएवढे अथांग असते. येथे तर नाथाभौंची दहा-अकरा मंत्रिपदे एका फटक्यात गेली होती. तीही एक-दोन फडतूस आरोपांमुळे! आरोप करायचे तर त्यासाठी बैलगाडीभर पुरावे द्यावेत. ते आधी न्यायालयात सिद्ध करावेत आणि मग आरोप करून राजीनामा मागावा. पण येथे उलटेच झाले. केवढे मेरू पर्वताएवढे असेल त्याचे दु:ख! आणि अशा वेळी भाजपच्याच एका आमदाराने नाचावे? बरे त्याने इतरांप्रमाणे मनातल्या मनात भाजपनाटय़म् केले असते, तर कोणाचेही काही म्हणणे नव्हते. पण त्याने रेल्वेत हात वर करून नाचावे? त्याची ध्वनिचित्रफीत काढावी आणि ती नाथाभौंना दिसेल अशी व्यवस्था करावी? हे म्हणजे स्वामी सुब्रमण्यम यांच्या जेटलीविरोधी ट्वीटपेक्षा भयानक. खुद्द मुख्यमंत्र्यांनी नाथाभौंना स्वच्छतेचे प्रमाणपत्र दिले होते. ते एवढे सुस्पष्ट होते की काही साबू कंपन्या नाथाभौंना आपला जाहिरातदूत बनविण्याच्या विचारात होत्या म्हणे. पण त्या आमदाराच्या भाजपनाटय़म्ने घोळ केला आणि आतापर्यंत तोंडात चिक्की धरून बसलेल्या नाथाभौंच्या खेदसंतापाचा परमाणुबॉम्ब फुटला. ते म्हणाले, थोबाड रंगवायचे असेल, तर प्रथम त्या पक्षांतर्गत विरोधकांचे रंगवा. भीष्म पितामहांना हरवता येत नव्हते तेव्हा शिखंडीला पुढे आणण्यात आले. पक्षातील विरोधकांनी अंजली दमानियाबाई आणि प्रीती मेननबाई यांना पुढे आणले. ते आप-मतलबी कोण याचा खुलासा नाथाभौ लवकरच करणार आहेत. वस्तुत: नाथाभौ म्हणजे अत्यंत नि:स्वार्थी नेतृत्व. स्वत:च्या घराची आणि घराणेशाहीची पर्वा न करता त्यांनी जे काही केले ते पक्षासाठी केले. आता हे ‘जे काही’ म्हणजे काय याचा खुलासा कोणी मागू नये. काही राष्ट्रीय गुपिते राष्ट्रीयच राहावीत. खुद्द नाथाभौंनीसुद्धा अशी काही गुपिते आपल्या काळजाच्या कुहरात दडवून ठेवली आहेत. राजीनाम्याच्या वेळी ती उघड केली तर संपूर्ण हिंदुस्थान हादरला असता असे त्यांनी सांगूनच ठेवले आहे. कोणती बरे असतील ही गुपिते? कोणतीही असोत, नाथाभौंनी ती कुण्णाकुण्णाला सांगू नयेत. नाही तर संपूर्ण देशाची ‘किल्लारी’ व्हायची! कोणी काहीही म्हणो, अगदी नाथाभौ सरकारला ब्लॅकमेलीत आहेत किंवा भाजपच्या कारभारात काही काळेबेरे आहे, अशा काहीही वावडय़ा उडवोत, नाथाभौंनी ज्यातून सर्व काही साधले जाते असा मौनयोगच करावा. त्याहून उत्तम म्हणजे सरळ सरळ ‘आपण असे बोललोच नाही, माध्यमांनी बोलण्याचा विपर्यास केला,’ असा छानसा विश्वामित्री पवित्रा घ्यावा. म्हणजे मग परत एकदा ‘अजीब दास्ताँ हैं ये.’ हे गाणे म्हणत बसावे लागणार नाही. आता या वयात अशी गाणी वगैरे म्हणणे नाथाभौंसारख्या संतसज्जनास शोभेल का बरे?