हरयाणातील गुरगाव किंवा गुडगाँव म्हणजे तसे दिल्लीचेच एक उपनगर. पूर्वी औद्योगिक क्रांतीने अनेक शहरे वसवली. आता तंत्रक्रांतीने अनेक निमशहरांचा, शहरांचा कायापालट होत आहे. गुरगावलाही ही तंत्रक्रांती पावली. अंगांगी त्या श्रीमंतीने झळाळी आली. गगनचुंबी काचेरी इमारती, चकाकते रस्ते, त्यावरून सुळसुळत जाणाऱ्या गाडय़ा आणि ब्रँडेड माणसे.. गुरगावचा चेहरा पार बदलून गेला. गुरगावकरांना खंत होती ती हीच की आपल्या गावची प्राचीन समृद्ध परंपरा या शहरीकरणात पार हरवून गेली आहे. माणसांचे पोट तुडुंब भरले की त्यास संस्कृती आणि परंपरेची आठवण येते. गुरगावचे तेच झाले. या गावाला आपल्या इतिहासाची आठवण झाली. हा इतिहास महाभारतकाळापासूनचा. त्यानुसार हे गाव गुरू द्रोणाचार्याचे. त्यांच्या शिष्यांनी त्यांना गुरुदक्षिणा म्हणून दिलेले. म्हणून त्याचे नाव गुरू-गाव. त्याचा पुढे अपभ्रंश झाला. जसा कोलकात्याचा कॅलकॅटा, मुंबईचा बॉम्बे किंवा खडकीचा किरकी. तेव्हा मग संघर्ष सुरू झाला नामांतराचा, अस्मितेचा. त्याची सांगता मंगळवारी झाली. हरयाणा सरकारने गुरगावचे नामकरण अखेर गुरूग्राम असे केले. सोबतच मेवातचेही नूह असे झाले. यामुळे तेथील परंपराप्रिय नागरिकांच्या भावना सुखावल्या असतील. म्हणजे हा अखेर एक मानसिकच खेळ. त्यापरते त्यास प्रयोजन नाही. नामांतराने तसेही अस्मिता सुखावण्याखेरीज काहीच होत नसते. आपल्याकडील मराठवाडा तर हे प्रतिदिनी अनुभवत आहे. मुंबईकरांचाही अनुभव काही वेगळा नाही. ही अशी नामांतरे सुखाने होत असतील तर त्याकडे, राजकीय भाषेत सांगायचे तर, ‘नॉन इश्यू’ म्हणूनच पाहिले पाहिजे. पण अनेकदा तो ‘फालतू मुद्दा’ राहत नाही. त्याला एकमेकांवर सांस्कृतिक आणि राजकीय कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांचे पदर येतात. या सगळ्यातून हाती अखेर काय उरते? गुरगावचे नामांतर झाल्यानंतर कोणा एका व्यक्तीने ट्वीट केले होते, की आता गुरगावमधील मुलींनी रात्री आठनंतरही बाहेर पडण्यास हरकत नाही, कारण आता गुरगावच अस्तित्वात राहिलेले नाही. हा केवळ विनोद नाही. त्यात नामांतराच्या फलिताबाबतचे गंभीर भाष्य आहे. गुरगावचे गुरुग्राम झाले म्हणून काही तेथील शिक्षकांच्या मानमरातबामध्ये, त्यांच्या वेतनामध्ये वाढ होणार नाही, की तेथील विद्यार्थिनींच्या, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न धसास लागणार नाही. वाघ्याचा पाग्या झाला म्हणून काही त्याच्या स्वभावात फरक पडणार नसतो, त्याचा येळकोट जात नसतो. हे जसे शहरांबाबत असते, तसेच माणसांबाबतही असते. एखाद्या गल्लीतल्या नारोबाचा महापालिकेत जाऊन नारायणराव झाला म्हणून काही त्याचा मूळ स्वभाव जात नसतो. तसा मराठी माणसांना नामांतराच्या उद्योगामागचा खरा अर्थ कधीच कळाला आहे. पण भावनांचा प्रश्न आला की माणसांची डोकी गहाण पडतात. मग याचे नाव बदला, त्याचे नाव बदला अशा चळवळी सुरू होतात. गुरगावच्या नामांतरातून लाभणारा गुरुपदेश आहे तो एवढाच. तो गुरुग्रामकरांनाही लवकरच लाभेल यात शंका नाही..