दहा बाय दहाच्या कोठडीत डासांच्या दंशाने हैराण झालेले बाबा या कुशीवरून त्या कुशीवर वळत होते, पण झोप काही केल्या येत नव्हती. त्यांचा कॉम्प्युटररूपी मेंदूही जाम झाला होता. हार्डडिस्क बिघडली की काय, अशी शंका त्यांच्या मनात डोकावून गेली. ‘सब भूमी गोपाल की’ हेच त्यांच्या मनावर लहानपणापासून बिंबलेले. मग आश्रमासाठी थोडीफार जागा गोशाळेची घेतली तर असा काय फरक पडणार होता? आजवर कुणी काही बोलले नाही व आता आपल्याला गोपालऐवजी भोपाळचे वेध लागल्याबरोबर आश्रमच पाडला. या मामांना आता त्याची जागा दाखवून द्यायचीच. डोळे मिटल्यामिटल्याच बाबांनी मेंदूला आज्ञावली दिली. आपणच खरे साधू. विज्ञानयुगातले. मेंदूचा संगणकीय वापर करणारे. सर्वत्र आढळणाऱ्या गांजेकसांसारखे माना डोलावणारे नाही. मामाची धोरणे नाही पटली म्हणून गेलो नाथांसोबत तर एवढा राग धरायचा, वचपा काढायचा. साधू, साध्वींचे शाप  माहीत नाहीत तुम्हाला?  शेवटी तुम्हीही पक्ष वाढवण्यासाठी साधूंचाच आधार घेतला होता हे लक्षात असू द्या. साधूंनी केवळ तुमच्याच पक्षासोबत राहावे असा काही नियम आहे का? विरोधक आणि साधूंना एकाच मापात तोलण्याची चूक करत आहात तुम्ही. मामा कंसासारखे वागू नका. नर्मदेचे शुद्धीकरण हा माझा ध्यास आहे. तो तडीस नेण्यासाठी यात्रेची घोषणा करताच मंत्र्याचा दर्जा देण्याची घाई कररणारे तुम्हीच होतात. नाथांच्या सरकारने याच ध्यासाची दखल घेतली तर तुमचे पोट दुखले. राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी तुम्ही फोडाफोडीचे राजकारण केले तर चालते व आम्ही इकडून तिकडे गेलो तर लगेच कारवाई. लक्षात ठेवा, तुम्ही केवळ माझा आश्रम नष्ट केला, मेंदू नाही. तो अजूनही शाबूत आहे. साऱ्या ‘विदां’सकट. एक दिवस भस्म करून टाकेल तो तुम्हाला. नकळत बाबा जोरात बोलून गेले व पहाऱ्यावरच्या शिपायाने मान वळवली. ‘ए गप रे तू’ असे म्हणत तो शिपाई जोरात खेकसला. लहान्याच्या तोंडी कशाला लागायचे म्हणत बाबांनी संताप आवरून पद्मासन सुरू केले. साधूंनी राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगण्यात चूक काय, हा प्रश्न त्यांच्या मेंदूने विचारार्थ घेतला. खरे तर आपल्याला आपकडून लढायचे होते पण ते जमले नाही. मामांनी मंत्री केले पण प्रचार करू दिला नाही. नाथांनी ती संधी दिली व इच्छा पूर्ण झाली. त्याची एवढी किंमत मोजावी लागेल याची कल्पनाही केली नव्हती. मंत्र्यांचा दर्जा ते कोठडीतील कच्चा कैदी हा अकल्पित, अचानक झालेला प्रवास त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेला. भारतवर्षांत साधूंना सगळ्या गोष्टींची मुभा असते. सहसा त्यांच्या वाटय़ाला कुणी जात नाही. सारे नतमस्तक होण्यातच धन्यता मानतात. त्यामुळे मामा काही करतील असे बाबांना वाटलेच नव्हते. नाही म्हणायला नाथांनी धीर दिला. पाठीशी माणसे उभी केली पण जे व्हायचे ते होऊन गेले. आता काय, या प्रश्नाने बाबा थोडे भानावर आले. संधी ‘साधू’ व्हायचे की सत्तेला आव्हान देणारा साधू व्हायचे यावर ते विचार करू लागले. लगेच त्यांच्या मेंदूतील संगणकीय प्रणाली काम करू लागली. यात भावनेला थारा देऊन चालत नाही हे त्यांच्या लक्षात आले.. दीर्घकाळ सत्तेत राहू शकेल असा पक्ष मामाचाच. मग त्यांच्यासोबत जाणेच इष्ट म्हणत त्यांनी मेंदूला काम थांबवण्याचे आदेश दिले. भक्तांचे काय, हा प्रश्न त्यांच्या मनात येताच ते हसले. त्यांना नर्मदेच्या पाण्यात डुबकी मारायला लावली तरी पुरेसे.. असे म्हणत बाबांनी समाधानाचा सुस्कारा सोडला!