|| विजय दिवाण
अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ बायॉलॉजिकल सायन्सेसतर्फे ‘बायो-सायन्स’ नावाची एक संशोधन पत्रिका दर महिन्यास प्रसिद्ध होते. त्या पत्रिकेत जगभर सुरू असलेल्या जीवशास्त्रविषयक अभ्यासाची व संशोधनांची माहिती असते. तसेच त्या संशोधनांवर विविध शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेली मतेही तीत प्रसिद्ध होत असतात. या वैज्ञानिक पत्रिकेने जगभरातल्या सुमारे १४ हजार वैज्ञानिकांनी एकमताने प्रसृत केलेल्या सामूहिक निवेदनाविषयी ताज्या अंकात (९ सप्टेंबर २०२१) संपादकीय टिप्पणी केली आहे. सध्या जगात होत असणारे टोकाचे ऋतुबदल हे पृथ्वीवरील निसर्ग-संसाधनांच्या अतिरिक्त शोषणामुळे घडत असून, त्यामुळे आता पृथ्वीतलावर आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. पृथ्वीवरील संसाधनांचा हा ऱ्हास थांबविण्यात जगातील सर्व देशांची सरकारे अपयशी ठरली आहेत, असेही मत त्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. अलीकडे २०१९ सालापासून या जगात तीव्र उष्मावाढ, प्रदीर्घ अवर्षणकाळ, अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, महापूर, जंगलांत अकस्मात पेटणारे वणवे आणि समुद्रांतील चक्री-वादळे यांचे फटके युरोप, कॅलिफोर्निया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, उर्वरित दक्षिण आशिया तसेच आग्नेय आशिया या प्रदेशांना बसत आहेत.
पृथ्वीवरील निसर्ग-व्यवस्थेच्या ढासळत्या प्रकृतीचे निदान करण्यासाठी या शास्त्रज्ञांनी शहरांत मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड, वन-संहार, हरितगृह-वायूंचे उत्सर्जन, पर्वतीय हिमनद्या आणि सागरांतील हिमखंड याची कमी होत जाणारी घनता, सागरांचे आणि भूमीवरील जलस्रोतांचे होणारे प्रदूषण अशा वेगवेगळ्या लक्षणांचा अभ्यास केला. एकंदर ३१ लक्षणांपैकी १८ लक्षणे आता गंभीर अवस्थेला पोहोचली आहेत असे त्यांना आढळून आले. २०२०-२१ साली करोनाच्या साथीमुळे जगभरच थोड्याफार फरकाने टाळेबंदी आणि संचारबंदी लादली गेली होती. त्या काळात प्रदूषणाची पातळी थोडी घटली असली, तरी वातावरणातील कर्बवायूच्या आणि मिथेनच्या उत्सर्जनाचे प्रमाण मात्र सर्वोच्च होते ही गोष्ट त्यांनी अहवालात नमूद केलेली आहे. ग्रीनलॅण्ड आणि अंटाक्र्टिका या भागांत नेहमी साचून राहणाऱ्या बर्फाने सध्या नीचतम पातळी गाठलेली असून, गेल्या १५ वर्षांच्या तुलनेत आज तेथील बर्फ वितळण्याची गती तब्बल ३१ टक्क्यांनी वाढली आहे. आपण आता कितीही प्रयत्न केले आणि येत्या काळात घातक वायू-उत्सर्जनाचे प्रमाण थोडे कमी केले, तरीही ग्रीनलॅण्ड आणि अंटाक्र्टिका येथील बर्फाची झीज भरून येण्यास अनेक शतकांचा कालावधी लागणार आहे. २०१९ साली जगातल्या सर्व सागरांच्या जलाचे तापमानही वाढले आणि सागरी पाण्याची पातळीही वाढली. त्यानंतरच्या दीड वर्षात जगभर अनेक ठिकाणी अतिवृष्टी, नद्यांना पूर येणे आणि गावा-शहरांमध्ये कमरेपर्यंत पाणी साचणे अशा घटना घडल्या. अलीकडे कॅलिफोर्नियात आलेली उष्णतेची लाट, न्यूयॉर्क शहरात अतिवृष्टीमुळे साचलेले गुडघाभर पाणी आणि भारतात ढगफुटी व अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेलेली मुंबई, रत्नागिरी, खेड, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद इत्यादी शहरे ही त्याची साक्षीदार आहेत. २०१९ साली दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉनच्या जंगल-क्षेत्रफळात झालेली घट ही गेल्या बारा वर्षांतली सर्वोच्च घट होती. मागील काही वर्षांतल्या सर्वेक्षणांचा आढावा घेतला तर असे दिसते की, अॅमेझॉनच्या दाट अरण्यात सहेतुक लावल्या गेलेल्या आगी, त्यानंतर ब्राझीलमध्ये अवतरलेले प्रदीर्घ अवर्षणकाळ आणि सातत्याने केली जाणारी वृक्षतोड, यांमुळे अॅमेझॉनचे जंगल हे कर्बवायूचे शोषण करणारे जंगल न राहता उलट कर्बवायूचे प्रमाण वाढवणारे जंगल बनले आहे. तसेच सागरांच्या पाण्याचे वाढते तापमान आणि त्या पाण्यात विरघळणाऱ्या प्राणवायूचे घटणारे प्रमाण यांचे अनिष्ट परिणाम सागर-तळाशी असणाऱ्या प्रवाळांवर होत आहेत. त्यामुळे लक्षावधी लोकांना मिळणारे समुद्री अन्न घटले असून अनेक मच्छीमारांचे उत्पन्नही कमी झाले आहे. सध्या जगात पाळीव गायी-म्हशी, शेळ्या-मेंढ्या इत्यादी गुरांची संख्या बेसुमार वाढलेली असून ती तब्बल ४०० कोटी एवढी झालेली आहे. पृथ्वीच्या पाठीवर एवढ्या मोठ्या संख्येने आढळणाऱ्या पाळीव गुरांचे वस्तुमान हे या जगातली माणसे आणि सारे वन्यप्राणी यांच्या एकत्रित वस्तुमानापेक्षाही अधिक आहे, असे मत उपरोक्त वैज्ञानिकांनी व्यक्त केलेले आहे.
इंग्लंडमधील एग्झेटर विद्यापीठाच्या ‘ग्लोबल सिस्टम्स इन्स्टिट्यूट’चे एक निदेशक टिम लेण्टन यांनी म्हटले आहे की, अमेरिका (यूएसए) व कॅनडा या देशांत अलीकडे अनुभवास आलेली प्रखर उष्मावाढ ही काहीशी अनपेक्षित आणि धक्कादायक असली, तरी ती मानव-निर्मित हवामान बदलांचाच एक भाग होती. आणि या हवामान बदलांना त्या राष्ट्रांतल्या तथाकथित ‘विकासा’ची प्रक्रियाच कारणीभूत आहे. त्यामुळे आता सर्व राष्ट्रांनी उत्सर्जन-विरहित किंवा कमीत कमी उत्सर्जन करणारी विकास-व्यवस्था स्वीकारणे गरजेचे आहे. तसेच आपापल्या देशांतील नैसर्गिक संसाधनांची जाणीवपूर्वक वाढ करणे हेही गरजेचे बनले आहे.
एकूणच ऋतुबदलांच्या दुष्परिणामांमुळे आज जगात आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली असून या आपत्तीचे नियंत्रण करण्यासाठी वैज्ञानिकांनी सहा उपाय सुचवले आहेत. खनिज-इंधनांचा वापर पूर्णपणे बंद करणे, जमीन-पाणी-हवा यांचे प्रदूषण करणाऱ्या गोष्टी अव्हेरणे, सभोवतालच्या नैसर्गिक परिसंस्थांचे संरक्षण-संवर्धन सातत्याने करणे, सर्व देशांनी वनस्पतिजन्य आहारास प्राधान्य देणे, तसेच चैनीच्या अनावश्यक वस्तूंचे उत्पादन/अतिरिक्त शहरीकरण व काँक्रीटीकरण अशा ऱ्हासकारी विकास-प्रक्रिया नाकारणे, तसेच लोकसंख्या मर्यादित राखणे. ही सहा बंधने पाळण्याचे उत्तरदायित्व सर्व राष्ट्रांनी स्वीकारणे आता अनिवार्य आहे असा इशारा जगभरातील या १४ हजार वैज्ञानिकांनी दिलेला आहे. त्या दृष्टीने ऋतुबदलांचे दुष्परिणाम हा विषय शालेय अभ्यासक्रमांत सामील केला जावा आणि संसाधनांचे संरक्षण-संवर्धन करण्याबाबतची धोरणे आणि कायदे हे राष्ट्रीय स्तरांवर लागू केले जावेत असेही त्यांनी म्हटलेले आहे.
लेखक औरंगाबादस्थित पर्यावरण- अभ्यासक आहेत. vijdiw@gmail.com
