पुणे : बेकायदा सावकारी प्रकरणी माजी सरपंचासह दोघांविरुद्ध खंडणी विरोधी पथकाने कारवाई करुन गुन्हा दाखल केला आहे. नवनाथ ज्ञानोबा मासाळ (रा. माऊली निवास, पिसोळी), उमेश श्रीहरी मांगडे (रा. मांगडेवाडी, कात्रज) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मासाळ हा कोंढवा परिसरातील पिसोळी गावचा माजी सरपंच आहे. मांगडे हा मांगडेवाडीतील माजी सरपंचाचा मुलगा आहे. त्यांचे बांधकाम आणि हाॅटेल व्यवसाय आहेत. याबाबत एका व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदाराचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराला पैशांची गरज होती. २०२० मध्ये त्यांनी मासाळ याच्याकडे व्याजाने पैसे मागितले. तेव्हा मासाळ तक्रारदाराला घेऊन मांगडे याच्या हाॅटेलवर गेले. प्रतिमहा पाच टक्के व्याजाने तक्रारदाराने त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले. तक्रारदाराने त्यांची महागडी मोटार त्यांच्याकडे तारण ठेवली होती.तक्रारदाराने त्यांना व्याजापोटी चार लाख दहा हजार रुपये दिले. मात्र, काही महिन्यांचे व्याज थकल्याने आरोपींनी त्याची सदनिका आणि दुकान तारण ठेवले. दुकान आणि सदनिका परत करण्यासाठी ३३ लाख रुपये मागितले. पैसे परत न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा : मद्य पिऊन त्रास दिल्याने लहान भावाचा गळा दाबून खून ; कोंढवा भागातील घटना

तक्रारदाराने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार मासाळ आणि मांगडे यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे तपास करत आहेत.