ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गेल्या दोन वर्षांपासून एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेले नाही. परंतु मुंबईतील वानखेडे स्टेडियम कोहलीसाठी नेहमीच लाभदायी ठरले आहे. त्यामुळे कोहलीच्या ७१व्या शतकाची प्रतीक्षा वानखेडेवर संपणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

३३ वर्षीय कोहलीने नोव्हेंबर २०१९मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या प्रकाशझोतातील कसोटीत अखेरचे शतक झळकावले आहे. तसेच वानखेडेवर पाच वर्षांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या शेवटच्या कसोटीत कोहलीने २३५ धावांची खेळी साकारली होती. २०१७मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने येथे एकदिवसीय शतकही साकारले. याव्यतिरिक्त २०१९ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोहलीने पुण्यामध्ये कारकीर्दीतील सर्वोत्तम २५४ ही धावसंख्या नोंदवली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील खेळपट्टय़ा कोहलीसाठी लाभदायक ठरत असल्याचे दिसून येते. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान कोहलीनेसुद्धा वानखेडे त्याच्यासाठी खास असल्याचे नमूद केले.

‘‘वानखेडेवर माझी कामगिरी नेहमीच उत्तम झाली आहे. इंग्लंडविरुद्ध साकारलेल्या त्या द्विशतकाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. येथील खेळपट्टीवर सर्वाना समान न्याय मिळतो. संघासाठी सर्वोत्तम ते करण्याला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे. या कसोटीत शतक झळकावून योगदान देता आले, तर अधिक आनंद होईल,’’ असे कोहली म्हणाला. वानखेडेवरील चार कसोटींच्या सहा डावांत कोहलीने ७२च्या सरासरीने तब्बल ४३३ धावा केल्या आहेत.

आफ्रिका दौऱ्याबाबत लवकरच स्पष्टता

‘ओमायक्रॉन’ या करोना विषाणूच्या नव्या उत्परिवर्तनामुळे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत संभ्रम कायम आहे. कोहलीने मात्र यासंबंधी पुढील एक ते दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. ‘‘निश्चितच आमचे सर्व लक्ष्य न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीवर असले, तरी आफ्रिका दौऱ्याबाबतचा विचार मनात सुरूच आहे. प्रशिक्षक राहुल द्रविडने स्वत:हून सर्व वरिष्ठ खेळाडूंशी यासंबंधी संवाद साधला आहे. संघ व्यवस्थापन आणि ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांमध्ये याविषयी चर्चा सुरू असून पुढील काही दिवसांत आपल्या सर्वापुढे स्पष्ट चित्र उभे राहील,’’ असे कोहलीने सांगितले. भारतीय संघ आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार ट्वेन्टी-२० सामने खेळणार असून १७ डिसेंबरपासून कसोटी मालिकेद्वारे या दौऱ्याला प्रारंभ होणार आहे. मात्र आफ्रिकेतील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा दौरा लांबणीवर पडण्याचीच शक्यता अधिक आहे.

११ भारत वानखेडेवर २५ कसोटी सामने खेळला असून, यापैकी ११ सामने भारताने जिंकले आहेत, तर ७ सामने गमावले आहेत. याशिवाय ७ सामने अनिर्णित राखले आहेत.

१-१ उभय संघांत आतापर्यंत दोन सामने वानखेडेवर झाले असून, यापैकी एक सामना भारताने, तर एक सामना न्यूझीलंडने जिंकला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३० अश्विनने वानखेडेवर चार सामन्यांत ३० बळी मिळवले आहेत.