11 July 2020

News Flash

ऑनलाईन मालिका : डाव भावनिक राजकारणाचा

अलका अजूनही संभ्रमात होती. त्याला तिचा दोष नव्हता. कारण निवडून आलेल्या स्त्रिया काय करतात हे ती डोळ्यांनी पाहत होती. त्यामुळे आपण निवडून आल्यावर काय करणार

| August 14, 2014 01:15 am

पण विद्याचं सुशिक्षित, विचारी मन आशावादी होतं. आजपर्यंत अज्ञानात खितपत पडलेल्या या गावाला जगाची कसलीच ओळख नव्हती. अक्षर ओळख करून देऊन त्यांना आपण नवीन जग पाहाण्याचे डोळे दिले आहेत. पण हे नवीन जग फार भयानक आहे. ते पाहून आपण अज्ञानातच सुखी होतो असं त्यांना वाटायला नको. म्हणून आपल्या मनाशी काही गोष्टी ठरवूनच ती अलकाला म्हणाली,
‘‘हे बघ अलका, सध्याच्या परिस्थितीत सगळंच ढवळून निघालेलं आहे. वरूनच सगळं गढूळ होऊन येत असेल तर खालच्याने निवळायचा प्रयत्न तरी किती करायचा! आणि वाट तरी किती बघायची. मान्य आहे, अशा बरबटलेल्या समाजात प्रामाणिकपणे काम करणं अवघड आहे. पण हताश होऊन तरी कसं चालेल! लक्षात घेतलं पाहिजे की चिखलात उगवूनही कमळ आपलं रंग, रूप जसं आहे तसं घेऊन वर येतं. चिखलातून अगदी वर. त्याच्याकडं पाहिलं की मोह वाटतो त्याचा. भुरळ पडती त्याच्या सौंदर्याची. पण तेच कमळ ज्या चिखलातून उगवलं त्या चिखलाला घेऊनच वर आलं असतं तर…? म्हणून एक करायचं, पुरुषांपेक्षा वेगळं काही नाही करता आलं, तरी आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं, तेवढं तरी वेगळंपण असेल आपल्यात.’’
‘‘पण करून दिलं पाहिजे ना यांनी’’
अलका अजूनही संभ्रमात होती. त्याला तिचा दोष नव्हता. कारण निवडून आलेल्या स्त्रिया काय करतात हे ती डोळ्यांनी पाहत होती. त्यामुळे आपण निवडून आल्यावर काय करणार आहोत याचं चित्र तिला आताच दिसत होतं. तिनं विद्याला निवडून आल्यावर प्रामाणिकपणे काम करणाऱया फणसीच्या सरपंच बाईचं उदाहरण दिलं. म्हणाली,
‘‘फणसीची सरपंच, आरक्षणामुळं राखीव जागेचा फायदा मिळालेली. पण प्रामाणिकपणाने बदनाम झाली. डोईजड होईल म्हणून अविश्वासाचा ठराव मांडून वाट लावली तिची. उपसरपंच पुरुष. आता तोच बघतोय सगळं..’’
‘‘अलका, या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. अशा गोष्टी आपल्या वाटय़ाला आल्या तर आपणही समर्थ बनलं पाहिजे. त्यांनी तिच्यावर अविश्वास दाखवला, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही त्यांना विश्वासात घेण्यात असमर्थ ठरली, असंही म्हणता येईल. आपण अशा गोष्टींना बळी पडतो याला आपणच जबाबदार आहे. त्यांना दोष देऊन काय उपयोग. ते आपला उपयोग करून घेतात आणि आपण त्यांच्या हातचं बाहुलं बनतो. हे सगळं झुगारून दिलं तर अशा कोणत्याच गोष्टी आपल्या वाटय़ाला येणार नाहीत, ज्या तुझ्या मनात आहेत आणि दुर्दैवाने आल्याच तर त्या निपटायला मी तुझ्या पाठीशी आहेच.’’
अशा समजून सांगण्याने अलकातही थोडा धिटपणा आला. शिवाय विद्या बरोबर आहे म्हणून चांगल्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी थोडा निधी तर गोळा केलाच, पण प्रचारातही झोकून देण्याची तयारी दाखवल्यावर अलका विद्याच्या पाठिंब्यावर जामगाव गणामधून अपक्ष उमेदवार म्हणून पंचायत समितीसाठी उभी राहिली.

अण्णासाहेबांना ही गोष्ट अनपेक्षितच होती. आपल्या रानात अशा वेगळ्या जातीचं झाड कधी उगवेल याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. त्या झाडाला खतपाणी घालण्याचं काम नकळत आपल्याच हातून झालंय याची खंतही आता त्यांना लागून राहिली. आता ते पाडलं, तर आपल्याच अंगावर पडेल याचीही त्यांना भीती आहे.
यावर एक उपाय म्हणून त्यांनी एक दिवस सरूआक्काला बोलावून घेतली. आपल्या सुनेला गोडीगुलाबीने समजावून सांगण्याची विनंती केली. आणि तरीही नाही ऐकली, तर धाकदडपशाहीने घेण्याला माझी काही हरकत नाही असं स्पष्टपणे सांगितलं. विद्याच्या सासऱयाला म्हणजे भाऊंना तसंच सांगितलं. राजकारणाचा मुळातच तिटकारा असणाऱया भाऊंना हे आता नवं संकट वाटलं. प्रकाशनंतर विद्याही राजकारणाच्या वाटेवर चाललेली बघून ते आता घराचं काय होणार या विचाराने काळजीत पडले.
आजपर्यंत सरूआक्काला अण्णासाहेबांचा थोडा वचक होता. आमदारांची भाची आपली सून आहे याचं दडपण तिच्यावर कायम होतं.
पण अण्णासाहेब राजकारणासाठी आपल्याला विद्याशी असं वागायला लावतील याची तिनं कधी कल्पनाही केली नव्हती. राजकारणामुळे आपला एक मुलगा वाया चाललाय, त्यामुळे राजकारणाचा मुळात राग असणाऱया सरूआक्काने अण्णासाहेबांना तिथंच सांगितलं. म्हणाली,
‘‘अण्णासाहेब, या राजकारणामुळेच आमचं घर खिळखिळं व्हायला लागलंय. प्रकाशसाठी भाऊ झुरून झुरून पार खंगलेत आता. म्हणून तर त्याच्या हातापाया पडून या निवडणुकीला उभं राहून दिलं नाय त्याला.’’
‘‘त्याच्याबाबतीत माझं काही म्हणनं नाही. पण विद्या गावातल्या बायकांना बिथरवण्याचं काम करती, त्याला आळा घाला जरा.’’
अण्णासाहेबांना माहिती होतं, की प्रकाश उभा राहिला तरी तो आपल्या ताकदीसमोर टिकणार नाही. याचा अनुभव प्रकाशने या अगोदरही अनेकदा घेतला आहे. पण विद्याची गावातील प्रतिमा अलकाला फायदेशीर ठरणारी आहे. ही गोष्ट आयुष्य चुलीपुढं घालविणाऱया सरूआक्कालाही कळणारी होती. घरात होणाऱया चर्चेने गावात काय चाललंय हे थोडंथोडं तिलाही आता कळत होतं. तेव्हा विद्या काही चुकीचं करीत असेल असं तिला वाटलं नाही. म्हणून तीच उलट अण्णासाहेबांना म्हणाली,
‘‘विद्या तुमची भाची आहे. माझ्यापेक्षा तुम्हीच सांगा. तुमचंच ऐकणार ती. जसं कौतुक केलं तसा धाकही दाखवा थोडा.’’
सरूआक्काच्या या बोलण्यावरून तिला बोलावून काही फायदा झाला असं अण्णासाहेबांना वाटलं नाही. आज पहिल्यांदाच त्यांना विद्याचा सत्कार केल्याचा पश्चात्ताप झाला. हा सत्कार आपल्याला फायदेशीर ठरण्यापेक्षा तोटय़ात जाण्याची चिन्ह त्यांना आताच दिसायला लागली. विद्याचा सत्कार करून आपण स्त्रियांच्या कामाची किती दखल घेतो आणि त्यांना किती महत्त्व देतो, हे दाखवून तालुक्यातील स्त्री वर्गाची मतं आपल्या खिशात घालण्याचा त्यांचा डाव होता. पण विद्याच्या भूमिकेने त्या सगळ्यावरच आता पाणी पडतं की काय असं त्यांना वाटायला लागलं.
जामगाव गणातील जागा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची होती. इथं त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. क्षणभर त्यांना वाटलं, कांबळेसरांच्या जागी अलकालाच उभी केली असती तर आपली आणि आपल्या पक्षाची प्रतिमा आणखीनच उंचावली असती आणि हा संघर्षही उद्भवला नसता. पण पुढच्याच क्षणी अलकाला उभी करण्यामागचे तोटे त्यांना दिसायला लागले. चेअरमन, पुढारी कांबळेसरांसारखे राबणारे कार्यकर्ते आपल्यापासून दुरावले असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलकाचा प्रामाणिकपणा, आदर्शवाद आपल्याला गावात आडकाठी आणणारा ठरला असता.
शेवटी सर्व  गोष्टींचा विचार करून अण्णासाहेबांनी एक दिवस सर्व कार्यकर्त्यांना बोलावून आदेश दिला.

(क्रमश:)

– बबन मिंडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2014 1:15 am

Web Title: marathi online serial aarakshan part 19 baban minde
Next Stories
1 ऑनलाईन मालिका : स्त्री मनाची घालमेल
2 ऑनलाईन मालिका : राजकारणातील आदर्श
3 ऑनलाईन मालिका : माणसं, सांभाळलेली आणि दुखावलेली
Just Now!
X