वसई : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बहुजन विकास आघाडी समोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे. तीन दशकाहून अधिककाळ स्थानिक राजकारणात आपले वर्चस्व टिकवून ठेवणार्‍या बविआला फुटीचे ग्रहण लागले आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश होत आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्ष सक्रिय झाले आहे. विशेषतः लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपा चांगलीच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत. पालिका व जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर असल्याने विरोधी पक्ष असलेल्या बविआचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

नुकताच वसई पश्चिमेतील विशालनगर येथील बविआचे माजी नगरसेवक प्रदीप पवार आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

महापालिका निवडणुकीआधी बविआला मोठे भगदाड!

तर त्यापाठोपाठ नालासोपारा येथील सोपारा गावातील बविआचे प्रमुख कार्यकर्ते मोहक पाटील, सचिन देसाई, नितीन देसाई, निवास रहाटे, हितेश पाटील,हितेश निर्मल,जितेंद्र मेहता अशा ४० हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, मनोज पाटील, मनोज बारोट उपस्थित होते. निवडणूकीच्या तोंडावर बविआचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी हे भाजपात सामील होत असल्याने बविआसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.