Banjara Reservation Protest / वसई : महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या (ST) आरक्षणाच्या यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी वसई तालुक्यातील बंजारा समाजातर्फे मंगळवारी भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीतर्फे आयोजित या मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते.
सध्या बंजारा समाज विमुक्त जाती प्रवर्गात समाविष्ट आहे, परंतु अनेक राज्यांमध्ये या समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत (ST) करण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला संविधानाच्या अनुच्छेद ३४२ (२) नुसार अनुसूचित जमातीच्या आरक्षण टक्केवारीत स्वतंत्रपणे समावेश करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवारी वसईत सकल बंजारा समाजाकडून आंदोलन पुकारण्यात आले होते.
यावेळी पारंपरिक पेहराव परिधान करत ७०० पेक्षा जास्त महिला, पुरुष आणि युवा आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले होते. मंगळवारी सकाळी १० वाजता माणिकपूर मैदानातून या आंदोलनाची सुरुवात झाली. बंजारा आंदोलकांकडून माणिकपूर मैदानापासून वसईतील तहसीलदार कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.
तर भाषणे आणि लोकगीतांच्या माध्यमातून आंदोलकांनी आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी मागण्यांसंदर्भातील निवेदनही नायब तहसीलदारांना सादर करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाकडून अनुसूचित जमातीत समाविष्ट करून घेण्याची मागणी केली जात आहे. आम्हाला कुणाच्याही हक्काचे आरक्षण नको आहे. तर विमुक्त भटकी जमात प्रवर्गात जे तीन टक्के आरक्षण देण्यात आले आहे. तेवढंच आरक्षण आम्हाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून हवं आहे, अशी प्रतिक्रिया बंजारा आंदोलक रविकुमार राठोड यांनी दिली.
कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.