भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील मुख्य मार्गांवर प्रवास करत असताना खड्ड्यात अडकून महिला रिक्षा चालकाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात रिक्षाचे पुढील चाक निखळले असून चालक महिलेला तसेच एका प्रवाशाला दुखापत झाली आहे.
शुक्रवारी सकाळपासून मिरा भाईंदर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांत पाणी साचले आहे. सकाळी अकराच्या सुमारास काशिमीरा येथून गोल्डन नेस्टच्या दिशेने जाणारी एक अबोली (महिला रिक्षा चालक चालवत असलेली रिक्षा) अचानक खड्ड्यात अडकली आणि अपघात घडला.
अपघाताच्या धक्क्याने रिक्षाचे पुढचे चाक निखळले. त्या वेळी वाहनात महिला चालकासोबत एक प्रवासीही होता. दोघांनाही गंभीर स्वरूपाचा मार लागला असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत स्थानिकांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी करत आहेत. या अपघातामुळे शहरातील खड्ड्यांच्या समस्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.