वसई: टेलिव्हिजन जगात सध्या गाजत असलेला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस (Big Boss 19) हा रिऍलिटी शो. या शोमधील स्पर्धकांमध्ये होणारे वाद, त्यांच्यात होणाऱ्या स्पर्धा याच्या लहान मोठ्या चित्रफिती समाजमाध्यमांवर नेहमीच व्हायरल होत असतात. बिग बॉस कार्यक्रमाच्या १९ व्या सिजनमध्ये स्पर्धक म्हणून स्टॅन्ड अप कॉमेडियन प्रणित मोरेही (Pranit More) कार्यक्रमात सामील झाला आहे. यावेळी एका एका भागात त्याने विरार लोकल आणि गर्दीबाबत एक अलिखित नियम सांगितला आहे. एक असा नियम जो कळत नकळत विरार लोकलमधून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी पाळतो.
बिग बॉस १९च्या एका भागामुळे लोकलमधील प्रवासाचे काही खास अलिखित नियम अचानक चर्चेत आले आहेत. शहरातील लाखो लोकांसाठी जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधील रोजच्या प्रवासात लोक कशाप्रकारे हे नियम पाळतात, यावर स्पर्धक प्रणित मोरे आणि मालती चहर यांच्यात गप्पा रंगल्या होत्या.
चर्चेची सुरुवात झाली ती लोकल ट्रेनच्या प्रकारावरून. मालती चहरने ‘जलद’ आणि ‘धीम्या’ लोकल ट्रेनमधील फरक नेमका समजत नसल्याचे म्हटले. तर यावर जलद गाडीच्या दर्शकावर ‘एफ’ हे अक्षर असते, ज्यामुळे ती गाडी जलद असल्याचे लगेच ओळखता येते, असे उत्तर प्रणित मोरेने दिले. पण, तो काही एवढ्यावरच थांबला नाही. पुढे तो म्हणाला कि पण, जर तुला दादरवरून गोरेगावला जायचं आहे, आणि गर्दीच्या काळात तू विरार लोकलने प्रवास करत आहेस. तर विरार लोकलमधील प्रवासी बोरीवली स्थानकात उतरू पाहणाऱ्या प्रवाशाला उतरू देत नाहीत. त्याला ते दरवाज्यात अडवून ठेवतात पण उतरू देत नाहीत.
यावर मालती चहर, रेल्वे प्रशासनाचा असा काही नियम आहे का? कि ही या रेल्वे सेवेतील त्रुटी आहे? असा प्रश्न प्रणीतला विचारताना दिसत आहे. यावर प्रणित म्हणतो कि, असा काही नियम नाही, किंवा ही कोणती त्रुटीही नाही. जरी रेल्वेचा असा काही अधिकृत नियम नसला तरी लोकांना तो पाळावा लागतो. कारण विरारच्या प्रवाशांचं असं म्हणणं आहे कि, ही ट्रेन आमच्यासाठी आहे आणि यात फक्त विरारचे प्रवासीच चढणार. प्रणित मोरेच्या या व्हायरल चित्रफितीवर आता विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. काहींनी त्याने सांगितला प्रवासाचा हा अलिखित नियम पाळत असल्याचे सांगितले आहे. तर काहींनी आपल्या गर्दीच्या वेळी विरार लोकलमध्ये आलेला अनुभव सांगितला आहे.
