वसई : पालघर पाठोपाठ सोमवारी वसई विरार शहराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत. विविध नागरी सोयीसुविधांचे उदघाटन यासह बांबू लागवड उपक्रम व आमदार स्नेहा दुबे- पंडित यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते वसईत येणार आहेत. मुख्यमंत्री शहरात येणार असल्याने रविवारी सायंकाळपासूनच त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा जिल्ह्यात शुभारंभ, शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत, वाढवण बंदर चर्चा सभा, बांबू लागवड उपक्रम, वसई विरार महापालिकेच्या सर डीएम पेटिट विस्तारित रुग्णालय, बोळींज पोलीस ठाण्याचे एसीपी, डीसीपी कार्यालयाचे ऑनलाइन प्रणाली द्वारे उद्घाटन अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्या दरम्यान ते वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या माणिकपूर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते वसईत येणार आहे. दुपारी २.१० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.

यावेळी वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक, आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, खासदार डॉ. हेमंत सवरा, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार राजन नाईक, हरिश्चंद्र भोये व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

पालघर जिल्ह्यात निवडणुका जिंकल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वसईत येणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मुख्यमंत्री यांचा दौरा होणार असल्याने महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन व महसूलविभाग ही सज्ज झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात विविध ठिकाणी स्वागत फलक

मुख्यमंत्री शहरात दाखल होणार असल्याने ज्या मार्गाने मुख्यमंत्री शहरात दाखल होणार आहेत अशा मार्गावर भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामार्फत विविध ठिकाणी स्वागत फलक लावण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी झेंडे ही मोठ्या प्रमाणात लावण्यात आले असल्याचे चित्र दिसून आले आहे. तर काही ठिकाणी भर पावसात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम ही सुरू आहे.