वसई: घोडबंदर मार्गावरील गायमुख रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतुक चिंचोटी भिवंडी मार्गावर वळविली असल्याने त्याचा परिणाम चिंचोटी ते वसई फाटा व चिंचोटी – भिवंडी मार्गावर दिसून येत आहे. मोठ्या संख्येने अवजड वाहने ही मार्गावर जात असल्याने कोंडी निर्माण होत आहे.

मुंबई, पालघर, ठाणे तसेच गुजरात भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील गायमुख रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मागील काही दिवसांपासून या खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग कमी होऊन ठाणे, मुंबई अशा दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती.त्यासाठी आता घोडबंदर गायमुख रस्त्यावर ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे वाहतूक मार्गात बदल केले आहे.

ठाण्याच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने ही चिंचोटी भिवंडी या मार्गावरून वळविली आहेत. विशेषतः ठाण्याच्या दिशेने मालवाहतूक करणारी मोठ्या संख्येने वाहने आहेत. आता ही सर्व वाहने थेट चिंचोटी- कामण – भिवंडी मार्गे सोडली जात आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम महामार्गावर ही दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळपासूनच चिंचोटी ते वसई फाटा, सातीवली, सकवार अशा भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच चिंचोटी भिवंडी रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याने वाहतूक ही अगदी धीम्या गतीने सुरू आहे. त्याचाही परिणाम महामार्गावर दिसून येत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.

वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार वाहतूक नियोजन केले जात आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे.चिंचोटी मार्गावरूनच वाहने पुढे न जाऊ देता थेट या मार्गावर वळविली जातात. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी जागोजागी वाहतूक पोलीस नियुक्त केले आहेत. – अरविंद चौधरी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक चिंचोटी महामार्ग

ऐन सणासुदीला कोंडी

नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन चा सण असल्याने मोठ्या संख्येने बहिणी आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी घराच्या बाहेर पडतात. मात्र महामार्ग व राज्य मार्ग अशा दोन्ही मार्गावर ही कोंडी झाल्याने रक्षाबंधनसाठी बाहेर पडलेल्या बहिणींना ही याचा फटका बसू लागला आहे. याशिवाय या रस्त्यावर पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे दैनंदिन कामासाठी बाहेर पडणे ही कठीण होऊन बसले असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.