वसई : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी यासाठी चार रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित केले आहेत. या उड्डाणपुलांच्या कामाला गती द्यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे. या पुलांची कामे पूर्ण झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वसई विरार शहराचे क्षेत्रफळ ३८० चौरस किलोमीटर असून शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. याशिवाय शहरात वाहनांची संख्या ही बेसुमार वाढत आहे. त्यामुळे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी ही शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी होत असते. त्यासाठी रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार करून एमएमआरडीएकडे पाठविला आहे
त्यामध्ये उमेळा (वसई), आचोळे (नालासोपारा) अलकापुरी (नालासोपारा) आणि विराट नगर (विरार) या चार उड्डाणपूलांचा समावेश होता. पालिकेने त्यासंदर्भातील सर्वेक्षण व आराखडे सादर केले होते. मात्र निधीची अडचण व विविध विभागाच्या मंजुरी यासह तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडले आहे. बुधवारी मंत्रालयात आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे- पंडित यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक पार पडली. या बैठकीत एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. या चार रेल्वे पूल तयार झाल्यास शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल यासाठी पुलांच्या आवश्यक मंजुरीची कामे आहेत ती तातडीने मार्गी लागावी अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती.
रेल्वे पुलांच्या संदर्भात जी काही परवानगी बाकी आहे त्यांची कामे पूर्ण करून पुलांच्या कामाला गती देण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहे असे लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे.