वसई : नालासोपारा येथील मजेठीया नाट्य गृह उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र मागील सहा वर्षांपासून या कामाला गती मिळत नसल्याने त्याची रखड्डपट्टी झाली आहे. मंजूर अंदाजपत्रकात ध्वनिक्षेपण, वातानुकूलित आणि अग्निशमन अशा मुख्य यंत्रणांचा समावेश न केल्यामुळे अजूनही काम अपूर्णच आहे त्यामुळे वसईकरांना सुसज्ज नाट्यगृहाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वसई -विरार शहरात २००९ साली पालिकेची स्थापना झाली त्यानंतर १५ वर्षे लोटली तरीही पालिकेला अजूनही स्वतःच्या मालकीचे सुसज्ज असे नाट्यगृह शहरात उभारता आले नाही. २०२१ साली मजेठिया नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. काम वेळेत न झाल्याने २०२३ मध्ये पालिकेच्या विरोधात मानव अधिकार न्यायालयात दावाही दाखल करण्यात आला होता. त्यांनतर बांधकाम करण्यात आले मात्र नाट्यगृहाच्या आतील महत्वाच्या यंत्रणांचा निविदेत समावेश नसल्याने पुन्हा या यंत्रणा बसविण्यासाठी आणि आतील सजावट करण्यासाठी पालिकेने कामाला सुरुवात केली होती. ते काम सुरू होऊन जवळपास दोन वर्षे उलटून गेली तरीही त्याचे काम अजून काम पूर्ण होऊ शकले नाही.
पालिकेच्या संथगती कारभाराबाबत नाट्य प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. नाट्यगृहाचे काम तातडीने पूर्ण करून लोकार्पण करण्यात यावे अशी मागणी आता माजी स्थायी समिती सभापती किशोर नाना पाटील यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी पालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
कलाकार ,आयोजकांना खासगी सभागृहावर अवलंबून राहण्याची वेळ
वसई हे सांस्कृतिक शहर असून इथे वर्षभर अनेक सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम होत असतात. तसेच नाट्यक्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार ही या शहरात वास्तव्याला आहेत. मात्र, असे असले तरीही कार्यक्रमांच्या आयोजकांना खाजगी सभागृहांवर अवलंबून राहावे लागते. तिथले भाड्याचे दर हे जास्त असल्याने अनेकदा आयोजकांना कार्यक्रम रद्द करावे लागतात. तसेच सुज्ज नाट्यगृह नसल्याने मुबंई-पुण्यातील अनेक नाट्य संयोजक वसईत नाटकाचे प्रयोग करत नाही. त्यामुळे वसईकरांना नाटकाचे प्रयोग पाहण्यासाठी मुंबईला जावे लागत असल्याचे नाट्यप्रेमींनी सांगितले आहे.
सरावाला व नाट्यप्रयोगासाठी अडचणी
वसई विरार शहरात १५ ते २० नाटकांचे समूह आहेत. या समूहामध्ये वेगवेगळे अडीचशे ते तीनशे तरुण कलावंत आहेत, नाशिवाय वरिष्ठ फलाका वेगळे आहेत. मात्र या कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी आवश्यक असणारी पार्श्वभूमी येथे नाहीत. वसई, विरार शहरात एकही व्यवसायिक नाट्यगृह नाही. त्यामुळे या कलाकारांना सराव करण्यासाठी तसेच आपले प्रयोग सादर करण्याची संधी मिळत नाही. नाट्यगृहाची सोय नसल्याने सरावाला अडचणी येतात.
कालाकारांना नाटक सादर करायचे झाल्यास सभागृह मिळतो पण त्यात प्राथमिक सोयी नसतात. पडदे लावणे, ध्वनी यंत्रणा यासह इतर सुविधा नसल्याने अडचणी येतात. नाट्यगृहाचे काम मार्गी लावण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच काम पूर्ण करून १ मे पर्यंत नाट्यगृहाचे लोकार्पण केले जाईल.प्रकाश साटम, प्रभारी कार्यकारी अभियंता