करोना रुग्णसंख्येत साडेसात हजारांनी घट; लागण दर १० वरून अडीच टक्क्य़ावर

वसई: मागील दोन महिन्यांपासून वसई-विरार शहरातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे शहरात आढळून येणाऱ्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. मे महिन्याच्या तुलनेत रुग्णसंख्या ७ हजार ८०० ने घटली आहे. म्हणजे रुग्णांचे प्रमाण ७० टक्कय़ांनी घटले आहे. रुग्ण सकारात्मकतेचा दरही १० वरून अडीच टक्कय़ांवर आला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका हा वसई-विरारला बसला होता. सुरुवातीला दिवसाला सरासरी ६०० ते ७०० रुग्ण आढळून येत होते. जून महिन्यात  प्रमाण कमी होऊन सरासरी १०० ते ११० इतके झाले आहे. मे महिन्यात शहरात ११ हजार ३४  रुग्ण आढळून आले होते. जून महिन्यात केवळ तीन हजार १७४ एवढे रुग्ण आढळून आले आहेत. म्हणजेच सात हजार ८६० ने रुग्णसंख्येत घट झाली आहे.  मृत्यूच्या प्रमाणातही घट झाली आहे. यात मे महिन्यात २३८ जणांचा  तर जूनमध्ये १३३ जणांचा बळी गेल्याने  प्रमाण हे १०५ ने  कमी झाले आहे. त्यामुळे जून महिना वसईकरांसाठी दिलासादायक ठरला आहे. सध्या स्थितीत शहरातील एकूण बाधितांची संख्या ६८ हजार १५३ इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या एक हजार ४७१ इतकी झाली आहे. त्यामुळे शहरातील मृतांचे प्रमाण हे २.१५ टक्के इतके राहिले आहे. अजूनही १ हजार २१३ रुग्ण उपचाराधीन आहेत. शहरातील करोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.

लागण दरात घट

वसई-विरारमधील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने करोनाच्या संदर्भात लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी  करोनाचाचण्या करण्यावर अधिक भर दिला होता. यात आरटीपीसीआर व अँटिजेंन अशा दोन्ही प्रकारच्या चाचण्या केल्या जात आहे. मे महिन्यात एक लाख एक  हजार ८७५ इतक्या चाचण्यांपैकी १०.८३ टक्के इतके रुग्ण सकारात्मक आढळून आले होते.तर जूनमध्ये एक  लाख २३ हजार ५१६ इतक्या चाचण्या केल्या त्यापैकी २.५६ टक्के इतके रुग्ण सकारात्मक आढळून आले आहेत. त्यामुळे ८.२७ टक्कय़ांनी यात घट झाली आहे.

९६ टक्के रुग्ण करोनामुक्त

एकीकडे करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असतानाच वसई- विरार शहराची करोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र दिसून आले आले आहे. मे महिन्याच्या अखेरीस शहरातील ९२. ३६ टक्के इतके रुग्ण करोनातून बरे झाले होते. त्यात आणखीन बरे होणाऱ्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत ९६.०६ टक्के इतके रुग्ण बरे झाले आहेत. करोनामुक्तांच्या संख्येत ४ टक्कय़ांची भर पडली आहे.

जूनमधील रुग्णसंख्या

१,२३,५१६ एकूण चाचण्या

३,१७४ एकूण रुग्ण

२.५६%  लागण दर

१३३  मृत्यू

५,४४९ करोनामुक्त रुग्ण