वसई: वसई विरार शहरात भरधाव वेगाला नियंत्रित करण्यासाठी महापालिकेने रस्त्यात ठिकठिकाणी नवे गतिरोधक बांधण्यात आले आहेत. मात्र या गतिरोधकांवर मार्गदर्शक पट्टे नसल्याने हेच गतिरोधक धोकादायक बनत चालल्याचे दिसून येत आहे. विशेषतः रात्रीच्या अंधारात हे गतिरोधक दिसून येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढणारी वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी पालिकेकडून जोड रस्त्यांच्या परिसरात गतिरोधक बांधण्यात आले आहेत. आगाशी- विरार या मुख्य रस्त्यावर महापालिकेच्या बोळींज रूग्णालयाच्या परिसरात तसेच डीटी हॉटेलच्या समोर नव्याने गतिरोधक बांधण्यात आले आहेत. यावर चुना पावडरीच्या साहाय्याने तात्पुरते पट्टे आखण्यात आले होते. मात्र ते पट्टे पुसले गेल्याने वाहनचालकांना हे गतिरोधक दिसून येत नाहीत. त्यामुळे वेगात येणारी वाहने गतिरोधकावरून आदळण्याचे प्रमाणही वाढले आहे.
तसेच नालासोपारा येथील गास रस्ता, भुईगाव रस्ता यासह पश्चिम पट्ट्यांतील गावांमध्येही अनेक रस्त्यांवरील गतिरोधक हे मार्गदर्शक पट्ट्यांविनाच असल्याने असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते जॉय फरगोस यांनी सांगितले आहे.
पांढऱ्या रंगाचे दर्शक पट्टे नसल्यामुळे वाहनचालकांना ते दृष्टीस पडत नाहीत. विशेषतः रात्रीच्या व अपुरी प्रकाशव्यवस्था असलेल्या ठिकाणी हे गतिरोधक अपघातास कारणीभूत ठरत आहेत. अनेकदा एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी जोड रस्त्यांचा वापर नागरिकांकडून केला जातो मात्र गतिरोधक लक्षात न आल्याने अपघात घडतात असे नागरिकांनी सांगितले आहे. या गतिरोधकांवर लवकरात लवकर मार्गदर्शक पट्ट्यांची आखणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नियमांची पायमल्ली
गतिरोधकाची उंची दहा सेंटिमीटर, लांबी साडेतीन मीटर असणे आवश्यक आहे. तसेच वाहनचालकांना गतिरोधक असल्याची सूचना मिळण्यासाठी चाळीस मीटर अंतरावर सूचना फलक असावा, असाही नियम आहे. गतिरोधक तयार करताना वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच गतिरोधकावर थर्मोप्लॅस्टिक पेंटने तयार केलेल्या पट्ट्या असाव्यात असा नियम आहे. परंतु काही ठिकाणी नियमांची पायमल्ली करून गतिरोधक तयार करण्यात आले आहेत, अशा तक्रारी आहेत.
वारेमाप गतिरोधक
शहरात मोठ्या प्रमाणात गतिरोधक असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रस्त्याची दुरूस्ती करताना अथवा खड्डे बुजवताना गतिरोधक कमी करण्याऐवजी नवीन गतिरोधकांची भर पडते, असे सामाजिक कार्यकर्ते चार्ली रोझरीयो यांनी सांगितले. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविताना चालकांना त्रास सहन करावा लागतो.यात ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, रुग्ण अशा प्रवासी वर्गाला याचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत सार्वजनिक बांधकाम व पालिकेकडे तक्रारी केल्या जातात. मात्र त्याकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रोझरीयो यांनी केला आहे.
वसई विरार शहरातील गतिरोधकांवर मार्गदर्शक पट्टे नसल्याने अपघाताचा धोका वाढला असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत होत्या. अखेर जकार्यक्षेत्रातील रस्त्यावरील गतिरोधकांवर दर्शक पट्टे (White Reflective Strips) लावण्याचे आदेश संबधित उपअभियंता व शाखा अभियंता प्रभाग ए ते आय यांना देण्यात आले आहेत. -प्रकाश साटम, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता महापालिका