भाईंदर : पावसाळ्यात मिरा भाईंदर शहरातील सखल भागात पाणी साचून दुर्घटना घडू नयेत, यासाठी हे परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे वेळेवर उपाययोजना राबवून परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

मिरा भाईंदर हे शहर खाडी किनारी वसलेले आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास येथील सखल भागात पाणी साचते. शहरात काही विशिष्ट सखल भाग आहेत, जिथे दरवर्षी पाणी तुंबते. यात भाईंदर पश्चिमेतील बेकरी गल्ली, मिरा रोडचा हटकेश परिसर, सिल्वर सरिता, महामार्ग परिसरातील कृष्ण स्थळ, मुन्शी कंपाउंड, लक्ष्मीबाग आदी ठिकाणांचा समावेश आहे. या भागांमध्ये जोरदार पावसात तीन ते साडेतीन फूट पाणी साचते. अनेक वेळा इमारतींच्या तळमजल्यावरील घरांमध्ये पाणी शिरून रहिवाशांचे नुकसान होते. जलभराव झाल्यानंतर त्या भागातील वीज खंडित केली जाते. परिणामी, नागरिकांना अनेक तास वीजेविना राहावे लागते.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सखल भागातील पाणी उपसण्यासाठी सक्शन पंप बसवले जात आहेत. तसेच, पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्यास नवीन नाल्यांची उभारणीही केली जात आहे. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत, शहरातील सखल भागांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी घेतला आहे. यामुळे शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा एकत्रित आढावा घेऊन तातडीने उपाययोजना आखणे प्रशासनाला सोपे होणार असल्याची माहिती उपायुक्त सचिन बांगर यांनी दिली आहे.

नियंत्रण कक्षाशी जोडणी

मिरा भाईंदरमधील सखल भागांवर लक्ष ठेवण्यासाठी बसवण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षासोबतच प्रत्येक प्रभाग कार्यालयात स्थापन होणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन कक्षांशी जोडले जाणार आहेत. हे कक्ष पावसाळ्यात २४ तास सुरू असतील. त्यामुळे मुसळधार पावसात सखल भागांमध्ये जलभराव सुरू होतो आहे का, याची माहिती प्रशासनाला त्वरित मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७८ ठिकाणांची यादी जाहीर

मिरा भाईंदर शहरात पावसाळ्यादरम्यान जलभराव होण्याची शक्यता असलेल्या ७८ ठिकाणांची यादी महापालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे. ही यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही सर्व ठिकाणे जलभरावाच्या दृष्टिकोनातून अतिसंवेदनशील मानली जात आहेत. यापैकी बहुतांश ठिकाणी पाणी उपसण्यासाठी महापालिकेकडून उपसा पंप बसविण्यात आले आहेत.