भाईंदर – मिरा भाईंदर मेट्रो प्रकल्प ९ मधील भाईंदर पूर्व-पश्चिम परिसराला जोडणाऱ्या उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळावरून अखेर मेट्रोचा पूल देखील उभारण्यात आला आहे. हे काम पूर्ण झाल्यामुळे मेट्रोच्या कामास गती मिळणार असल्यास दावा करण्यात येत आहे.
मागील पाच वर्षापासून मिरा भाईंदर शहरात ‘दहिसर भाईंदर मेट्रो मार्गीका ९’ उभारणीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.सध्या या प्रकल्पाचे स्थापत्य काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून मेट्रो स्थानक व मार्गीकेचे काम पूर्ण केले जात आहे. यात आता कामाचे विभाजन करून दहिसर ते काशिगाव पर्यंत टप्पा एक आणि काशिगाव ते भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान हा दुसरा टप्पा ठरवण्यात आला.
यावरून टप्पा एकसाठी नुकतीच मेट्रो चाचणी पूर्ण झाली असून येत्या डिसेंबर अखेरीस या मार्गांवर मेट्रो धावणार आहे.तर दुसऱ्या टप्प्याचे काम देखील प्रगती पथावर सुरु आहे. यात सुभाष चंद्र भोस मैदानापर्यंत मेट्रो घेऊन जाण्यासाठी भाईंदर पूर्व-पश्चिम परिसराला जोडणाऱ्या उड्डाणपुलाखालील रेल्वे रूळ देखील ओलांडावा लागणार होता. त्यानुसार मागील तीन दिवस रात्रीच्या वेळेस काम करून हा पूल उभारण्यात आला आहे.
स्टीलचा गर्डर
रेल्वे रुळावर पूल उभारण्यासाठी एमएमआरडीए प्रशासनाने स्टील गर्डरची उभारणी केली आहे.तर अन्य ठिकाणी सिमेंटचे गर्डर उभारण्यात आले आहेत. प्रामुख्याने हे ३ स्टील गर्डर आहेत. हे बसवण्यासाठी ७ जून ते ९ जून दरम्यान तीन दिवस रेल्वे ब्लॉक व वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता. तर या प्रसंगी रेल्वे, एमएमआरडीए स्थानिक पोलिस,अग्निशमन कंत्राटदार जे. कुमार यांचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे हे काम पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती