भाईंदर:- मिरा भाईंदर शहरातील वनपट्ट्यात बांबूची लागवड केली जाणार आहे. त्याच्या देखभालीची जबाबदारी आदिवासींवर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे आदिवासींचे होणारे स्थलांतरण थांबविण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने ‘बांबू लागवड’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने मिरा भाईंदर परिसरातील आदिवासींच्या वनजमिनींवर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. या लागवडीमुळे आदिवासींना स्थानिक स्तरावर उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार असून, त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.प्रामुख्याने रोजगाराच्या अभावामुळे आदिवासी सतत स्थलांतरण करत असतात.

ठाणे आणि मिरा भाईंदर महापालिका हद्दीतील ३७ गावांतील एकूण १८२६ आदिवासी शेतकरी ३५१ एकर क्षेत्रावर दीड लाख बांबू रोपे लावणार आहेत. यापैकी ठाणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या आदिवासी पट्ट्यात सध्या ५० हजार बांबूंची लागवड पूर्ण झाली आहे. या लागवडीसाठी लागणारी रोपे ठाणे महापालिकेने पुरवली आहेत.मिरा भाईंदरमधील काशिमीरा, घोडबंदर आणि चेना येथील आदिवासींच्या जमिनीवर पुढील वर्षी याच पद्धतीने बांबू लागवड केली जाणार असून, महापालिका त्यासाठी ५० हजार बांबू रोपे उपलब्ध करून देणार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विशेष सहकार्य केल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली.

५७ हजार आदिवासी कुटुंबांना रोजगार देण्याचे लक्ष

आगामी तीन वर्षात या बांबूच्या रोपांची पूर्ण वाढ होणार आहे.बांबूपासून तयार होणार्‍या वस्तूंसाठी लागणारा कच्चा माल त्यातून तयार होणार आहे. हा कच्चा माल राज्य सरकारने आदिवासींकडून खरेदी करावा असे प्रयत्न श्रमजीवी संघटना करत आहे. यामु्ळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील ५७ हजार आदिवासी कुटुंबांना स्थानिक पातळीवरच उत्पन्न मिळणार आहे. परिणामी त्यांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागणार नाही.