मुंबई : चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा यांच्याविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फन्ने खान’ या चित्रपटाच्या सहनिर्मात्या नफिसा खान यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार कशिश उर्फ निफिसा खान (३७) या अंधेरीत राहतात. त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार २०१८ मध्ये त्यांची ओळख चित्रपट निर्माचती प्रेरणा अरोरा यांच्याशी झाली. त्यांनी ऐश्वर्या राय, अक्षय कुमार, जॉन अब्राहम आदी कलाकारांसमेवत काम केल्याचा दावा केला होता. त्यामुळे तक्रारदार नफिसा खान यांचा प्रेरणा यांच्यावर विश्वास बसला होता.

दरम्यान, प्रेरणा अरोरा यांनी ‘फन्ने खान’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटासाठी त्यांना पैशांची आवश्यकता होती. त्यासाठी अरोरा यांनी तक्रारदार नफिसा यांना सहनिर्माता बनण्याचा प्रस्ताव दिला. त्यासाठी ५० लाख गुंतविण्यास सांगितले. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर एकूण नफ्यापैकी ५ टक्के हिस्सा, तसेच मूळ रकमेच्या तुलने १० लाख रुपये अधिक देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच चित्रपटाच्या श्रेयनामावलीत सहनिर्माती म्हणून नाव टाकण्याचेही आश्वासन दिले होते. यावेळी प्रेरणा अरोरा यांनी ६० कोटींची मुदत ठेव असल्याचे कागदपत्रे दाखवले. या मुदत ठेवीवर कर्ज मिळत नसल्याने निधीची चणचण असल्याचे भासवून विश्वास संपादन करण्यात आला होता. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत सहनिर्माती म्हणून नाव येईल, तसेच नफा मिळेल या आशेपोटी तक्रारदार नफिसा यांनी अरोरा यांना चित्रपटात गुंतविण्यासाठी ५० लाख रुपये दिले होते. यासाठी करार करण्यात आला होता. मात्र तक्रारदार नफिसा आणि प्रेरणा अरोरा यांची आई प्रोतिमा अरोरा यांच्यात करार झावा. त्या क्रिअर्ज एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका होत्या.

‘फन्ने खान’ चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. त्यात ऐश्वर्या राय, अनिल कपूर, राजकुमार राव आदी कलाकार होते. मात्र चित्रपटाच्या श्रेयनामावलीत तक्रारदार नफिसा खान यांचे नाव वगळण्यात आले. त्यांना सिनेमाच्या नफ्याचा ५ टक्के हिस्सा देखील देण्यात आला नाही. या काळात वडील आजारी असल्याचे कारण देत अरोरा यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यांनी खान यांना दिलेले धनादेश देखील वटले नाहीत. आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर अरोरा यांच्या मुदत ठेवीची कागदपत्रे बनावट असल्याचे आढळले. त्यामुळे शेवटी नफिसा यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून प्रेरणा अरोरा, तसेच त्यांची आई प्रोतिमा अरोरा यांच्याविरोधात फसवणूक, बनावट दस्तावेज तयार करणे आदी विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत, असे वर्सोवा पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रेरणा अरोरा यांची कारकीर्द वादग्रस्त

प्रेरणा अरोरा यांनी ‘रुस्तम’ (२०१६), ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ (२०१७), ‘पॅड मॅन’ (२०१८), ‘परी’ (२०१८), तसेच ‘परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण’ या चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांचे वडील वीरेंद्र अरोरा यांनी स्थापन केलेल्या क्रिअर्ज या प्रॉडक्शन हाऊसच्या त्या संचालिका आहेत. प्रेरणा अरोरा यांना आर्थिक गुन्हे शाखेने निर्माते वासू भगनाना यांची ३१ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०२२ मध्ये मनी लॉंड्रींग प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.