वसई:- दिवाळी तोंडावर आली तरी वसई विरार महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्याने शुक्रवारी बहुजन विकास आघाडीने नालासोपाऱ्यात आंदोलन केले. यावेळी खड्ड्यांच्या सभोवती रांगोळ्या व दिवे लावून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे.

पावसाळ्यापासून वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना ही समोर येत आहे. गणेशोत्सव झाला, नवरात्री उत्सव ही संपला आता दिवाळी सुरू झाली तरी रस्ते दुरुस्तीकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. वेळेत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त न केल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य ही तयार होऊ लागले आहे. एकीकडे खड्डे तर दुसरीकडे धूळ प्रदूषण अशा दुहेरी कोंडीत वसई विरारची जनता सापडली आहे.

याबाबत पालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे तरी सुद्धा पालिकेचे केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नालासोपारा येथील रस्त्यावर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात रांगोळी काढून त्यात दिवे लावून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांची खूप गैर सोय होत आहे अशात गणपती, नवरात्री नंतर आता दिवाळी तोंडावर आली तरी पालिकेला शहरातील खड्डे बुजवायला जाग येत नसल्याने असे आंदोलन करण्यात आल्याचे माजी सभापती निलेश देशमुख यांनी केला आहे. पालिकेने आतातरी जागे होऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.