वसई: वाढत्या उन्हाच्या उकाड्यामुळे अंगाची लाही-लाही होत असताना वसई विरारमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. मात्र करण्यात येत असलेले भारनियमन अघोषित असल्याने नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. वसई विरार शहरात महावितरणच्या वीज पुरवठा विभागाकडून वसई विरार शहरासह वाडा विभागाला वीज पुरवठा केला जातो. घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, कृषी असे साडे लाखाहून अधिक वीज ग्राहक आहेत.
वसई विरार भागात वर्षाला सरासरी अडीच हजार मेगा युनिट इतकी वीज लागते. मात्र मागील काही दिवसांपासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. हवेतील आद्रतेमुळे तापमान ३३ ते ३५ अंशावर असल्याने उन्हाच्या झळा तीव्र जाणवत आहेत.
या वाढत्या उन्हाच्या उकाड्यामुळे घरात, ऑफिस, औद्योगिक क्षेत्र यासह विविध आस्थापना यामध्ये कुलर, पंखा, वातानुकूलित यंत्र ( एसी) याचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढू लागली आहे. विजेची मागणी वाढत असल्याने वसई विरार मधील विविध ठिकाणच्या भागात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्री बेरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. विशेष आजारी रुग्ण, लहान मुले यांचे प्रचंड हाल होत आहेत. आधीच तापमान वाढीमुळे अंगाची लाही लाही होते त्यातच वीज पुरवठा खंडित होत असल्याने आणखीन त्रास सहन करावा लागत आहे.
तर दुसरीकडे दैनंदिन कामे ही खोळंबून जात आहे. एकदा वीज गेली का तीन ते चार तास येत नाही त्यामुळे कामे ही पूर्ण होत नाहीत. सतत वीज जात असल्याने वीज समस्येबाबत महावितरणच्या तक्रार क्रमांकावर संपर्क केला असता तांत्रिक बिघाड झाल्याची कारणे पुढे केली जात आहेत. आता अनेक ठिकाणी पावसाळा पूर्वीची कामे सुरू केली आहेत. वीज नसल्याने विजेवर चालणारी यंत्र वापरता येत नाहीत.
वीज वितरणाचे नियोजन नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. वारंवार तक्रारी करूनही लक्ष दिले जात नाही त्यामुळे वीज देयकांच्या पताका तयार करून सर्वत्र लावून निषेध व्यक्त केला जाईल असे भूमिपुत्र फाऊंडेशन अध्यक्ष सुशांत पाटील यांनी सांगितले आहे.
महावितरणचे वीज सेवा पुरविण्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे वीज चोरी होते. तर दुसरीकडे नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा मिळत नाही याबाबत तक्रारी करूनही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे जॉन परेरा यांनी केला आहे.
अघोषित भारनियमनाचा फटका
वसई विरार शहरात सद्यस्थितीत कोणत्याही वेळेला वीज पुरवठा खंडित होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणने वीज भारनियमन करताना त्याची माहिती वीज ग्राहकांना देणे गरजेचे आहे. मात्र तशी कोणतीही माहिती न देताच वीज भारनियमन केले जात आहे. या अघोषित भारनियमनाचा फटका वीज ग्राहकांना बसत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने कामाचे नियोजन करणे, दैनंदिन कामे करणे अशा सर्वच अडचणी उभ्या राहत असल्याचे वीज ग्राहकांनी सांगितले आहे.
ट्रीपिंगच्या समस्येत वाढ
वीज वापराचे प्रमाण हे शहरात वाढले आहे. घरगुती वीज ग्राहकांच्या सोबत वसई विरार भागात औद्योगिक क्षेत्र सुद्धा आहे त्यामुळे विजेची मागणी अधिक वाढली आहे. त्यामुळे वीज वितरण व्यवस्थेवर ताण वाढत आहे. ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेहून अधिक भार झाल्यावर ट्रीपिंग होत असल्याचे प्रकार घडतात. काही वेळा मुख्य वाहिन्या ही ट्रिप होतात तेव्हा वीज पुरवठा खंडित होत असतो. वीज पुरवठा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने तांत्रिक पथके ही कार्यरत असून त्यांच्याकडून दुरूस्ती करवून घेतले जातात असे महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.तर जुने रोहित्र आहेत त्यांचे ऑइल ही बदलून दुरुस्त केले जात आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.
विजेची मागणी वाढली
उन्हाळ्यात सर्वाधिक वीज वापर होत आहे. त्यामुळे १५ ते २० टक्क्यांनी विजेची मागणी वाढली आहे. वसईत सुरवातीला ७५ ते ८० मेगा व्हॅट होते ते आता ८५ मेगा व्हॅट, वाडा ११५-१२० मेगा व्हॅट होते ते १३० मेगा व्हॅट, भावनगर ७००-७५० एएमपी वरून ९००-९५० एएमपी, नालासोपारा २४० मेगा व्हॅट वरून २५८ मेगा व्हॅट अशा प्रकारे वीज वापर वाढला असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
वीज समस्येसंदर्भात ससूनवघर, मालजीपाडा ग्रामस्थांचे निषेध आंदोलन
मागील काही दिवसांपासून वसई पूर्वेच्या मालजीपाडा, ससूनवघर व अन्य गाव पाड्यात सातत्याने वीज जात आहे. वीज गेल्यानंतर जवळ सहा ते सात येत नाही तर काही वेळा पूर्ण रात्रभर वीज नसल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणच्या निषेधार्थ मंगळवारी ससूनवघर, मालजीपाडा येथील ग्रामस्थांनी गावात वीज देयकांच्या पताका लावून निषेध व्यक्त केला आहे.
सणासुदीचे दिवस आहेत त्यातही वीज पुरवठा व्यवस्थित केला जात नाही असे यावेळी सुशांत पाटील यांनी सांगितले आहे. महावितरणने वीज पुरवठा सुरळीत केला नाही यापुढे आणखीन मोठे आंदोलन उभे करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.