वसई : रस्त्यात नागरिकांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्याकडील पैसे आणि ऐवज लुटणार्‍या अजय-विजय या कुख्यात भामट्यांच्या जोडगोळीला अखेर विरार पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून ५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. या दोघांवर तब्बल ६३ फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

रस्त्यात एकट्याने जाणार्‍या नागरिकांना विजय तांबे (५३) आणि अजय सावंत (५०) हे दोन भामटे गाठायचे. ‘काय मला ओळखतोस का?’ अशी सुरूवात करून हे दोघे भामटे अनोळखी व्यक्तीला बोलण्यात गुंतवायचे. समोरच्या व्यक्तीला काही कळण्याच्या आतच त्याच्याकडील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम हातचलाखीने काढून पसार व्हायचे. अजय-विजय नावाची ही भामट्यांची जोडगोळी नावाने कुप्रसिध्द होती.

हेही वाचा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना वसईत दाखवले काळे झेंडे, आगरी सेनेचे दोन कार्यकर्ते ताब्यात

या जोडगोळीने वसई विरारमधील नागरिकांना गंडा घालण्यास सुरूवात केली होती. विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ठाणे आणि मुंबईतील ४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यातील विजय तांबे याच्याविरोधात मुंबई आणि परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत ५३ तर अजय सावंत याच्यावर १३ गुन्ह्यांची नोंद आहे.

हेही वाचा : वसईला येण्याचा मार्ग खडतर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कबुली; म्हणाले ” एक महिन्यात… “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अभिजित मडके, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे, सचिन लोखंडे, संदीप जाधव, विशाल लोहार, इंद्रनील पाटील, सचिन शेरमाळे, योगेश नागरे, सचिन बळीद, बावाजी गायकवाड आदींच्या पथकाने या दोघांना अटक करण्यात यश मिळवले.