वसई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पालघर मतदारसंघात महाविकास आघाडीने माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी नालासोपारा येथून शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थित मशाल पेटवून सुरू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीचे वारे पालघर जिल्ह्यात वाहू लागले आहेत. इतर राजकीय पक्षांचा अजूनही उमेदवार जाहीर झाला नाही. मात्र महाविकास आघाडीतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचाराची सुरुवात पालघर जिल्ह्यात झाली आहे. शनिवारी संध्याकाळी महाविकास आघाडी ‘भारत जोडो, निर्भन बनो कार्यकर्त्यांचा महामेळावा नालासोपारा (पश्चिम) येथील तानिया बँक्वेट हॉलमध्ये पार पडला. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद वैद्य, उमेदवार भारती कामडी यासह विविध पक्ष व संघटनेचे प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेली मशाल प्रज्वलित करून प्रचाराची घोषणा यावेळी करण्यात आली.

हेही वाचा – पालिका गुंतली निवडणुकीच्या कामात, भूमाफिया जोमात

त्यानंतर नितीन बानगुडे पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना पालघर जिल्हा हा अशोक सम्राटाची भूमी आहे. अनेक जाती-धर्मांच्या मंदिरांचा वारसा जपणारा हा जिल्हा आहे. चिमाजी आप्पांच्या पराक्रमाचा संपन्न वारसा असलेली भूमी आहे. देशातील पहिला आण्विक ऊर्जाप्रकल्प, वारली चित्रकला, आशियातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असा पालघर जिल्हा असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यासोबतचा अनेक वेळा पक्षांतर केलेल्या खासदारांचा हा जिल्हा आहे अशा शब्दात खासदार राजेंद्र गावित यांना खोचक टोला लगावला.

भाजपाने देशाची वाट लावली आहे. वाढती महागाई, बेरोजगारी यासह अनेक प्रश्न आजही भेडसावत आहेत. याशिवाय उद्योग धंदे, येथील मोठे प्रकल्प गुजरातला पळवून देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई खिळखिळी करण्याचे काम भाजपने केले आहे. इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले पण हे राज्यकर्ते म्हणून आले आणि व्यापारी बनले आहेत अशा शब्दांत विरोधकांवर टीकास्त्र सोडले. विकास हवा आहे. पण पालघर जिल्ह्यात होत असलेला विकास हा विनाशकारी आहे. इथे सर्वसामान्य जनतेचा वाढवण बंदराला विरोध आहे. भूमिपुत्रांच्या छाताडावर विकासाच्या इमारती उभ्या राहणार असतील तर त्यांचा उपयोग तरी काय? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. डॉ.बाबासाहेबांनी संविधान दिले. जगातील सर्वात मोठी लोकशाही या देशात आहे. परंतु आता हे संविधान बदलण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी २०२४ ची लोकसभेची निवडणूक स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. भाजप विरुद्ध जनता व गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी ही लढाई असणार आहे असे नितीन बानगुडे पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मेहनत करा असे आवाहनही कार्यकर्त्यांना त्यांनी केले आहे.

शत्रू माहित नसताना आम्ही लढतोय – भारती कामडी

माझी उमेदवारी जाहीर होऊन चार दिवस झाले आहेत. पण विरोधकांचा एकही उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. तुम्हीच समजा याचा अर्थ काय ? आपल्या समोर नेमकं शत्रू कोण आहे हे माहिती नाही तरीही आम्ही सर्व ताकदीने लढत आहोत. ही लढाई आम्ही जिंकणार असा विश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – दगडखाणीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, मित्राने हत्या केल्याचे उघड

भाजपने हिंदू धर्म धोक्यात आणण्याचे काम केले

आगामी येणारी निवडणूक ही राजकीय निवडणूक राहिली नाही ती आता धर्माच्या विरोधात सुरू झाली आहे. भाजपने धर्माधर्मात तेढ निर्माण केले आहे. या निवडणुकीनिमित्ताने धार्मिक युद्ध सुरू झाले आहे. हिंदू धर्म धोक्यात आणण्याचे काम भाजपने केले आहे. सदाचार हा हिंदू धर्माचा आत्मा आहे. पण मोदी सरकारने हिंदू संस्कृतीची हत्या केली आहे. परंतु आपल्या सर्वांना मिळून हिंदू धर्माचे संरक्षण करायचे आहे. त्यासाठी आपल्याला मोदींना हरवायचे आहे. ज्यांना सत्याची चाड आहे; अशा सर्वांनी मोदींना हरवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन फादर मायकल यांनी या प्रसंगी केले.

फादर मायकल यांचे हितेंद्र ठाकूर यांना पत्र

वसई विरार शहरात बहुजन विकास आघाडी हा ताकदवर आणि पैसेवाल्यांचा पक्ष आहे. त्यांनी उमेदवार दिल्यास
अपशकून होऊ शकतो. त्यांनी आपला उमेदवार उभा करू नये असे पत्र बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी भाजपला साथ देऊन नये. त्यांनी मोदींना साथ दिल्यास त्यांचा भ्रष्टाचाराला पाठिंबा असल्याचा समज जनतेत जाईल. त्यापेक्षा इंडिया गंठबंधनला त्यांनी पाठिंबा द्यावा, अशा आशयाचे पत्र फादर मायकल यांनी दिले असल्याचे महामेळाव्यात सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha vikas aghadi campaign begins in vasai virar shivsena deputy leader nitin bangude patil attacks bjp ssb