वसई– दुबईत सोन्याची कंपनी सुरू करण्याच्या नावाखाली नालासोपारा येथील एका इसमाला ठकसेनाच्या त्रिकुटाने तब्बल ४५ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार त्रिकुटाचा शोध सुरू आहे.विवेक राय (४५) हे नालासोपारा पूर्वेच्या अंबावाडी येथे राहतात. ते चालक म्हणून काम करतात. सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांची ओळख भोला दुबे आणि निशा दुबे या दांपत्याशी झाली. या दोघांनी हरयाणा येथील नवीन चौधरी नावाच्या सोने व्यापार्‍याची ओळख करून दिली.

हेही वाचा >>> आयकर विभागाचा चालक बनला तोतया आयुक्त, नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना कोट्यवधींचा गंडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौधरी हा दुबईत सोन्याची कंपनी सुरू करणार असल्याचे सांगितले. राय याच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास ४ महिन्यात अनेक पटीने परतावा मिळेल असे आश्वासन दिले. त्याचा विश्वास बसावा यासाठी चौधरी हा राय यांना दुबईला देखील गेला होता. त्यामुळे राय या त्रिकुटाच्या भूलथापांना बळी पडला. राय याने आपले घर गहाण ठेवून, लोकांकडून कर्ज घेऊन सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या ५ महिन्याच्या कालावधीत तब्बल ४५ लाख रुपये या दांपत्याला दिले. त्यातील काही पैसे रोखीने तर काही धनादेशाने होते. मात्र राय यांना कुठलाही परतावा मिळाला नाही की मूळ रक्कमही परत मिळाली नाही. यामुळे त्याने पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर तुळींज पोलिसांनी या त्रिकुटाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रात्री आमच्याकडे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली.