भाईंदर :- मीरारोड येथे रस्ता ओलांडत असताना १२ वर्षीय शाळेकरी मुलाचा सिमेंट काँक्रीटची वाहतूक करणाऱ्या डंपर खाली येऊन मृत्यू झाल्यानंतर शहरातले वातावरण पेटून उठले आहे. यानंतर प्रशासन ही खडबडून जागे होऊन आरएमसी प्रकल्पाला टाळे ठोकले आहे.
गुरुवारी काशिमीरा येथील नीलकमल नाक्याजवळ १२ वर्षीय सन्नी राठोड हा रस्ता ओलांडत असताना सिमेंट काँक्रीट वाहतूक करणाऱ्या डंपरखाली आला होता. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच भागातील पाच सिमेंट काँक्रीट प्रकल्प बंद करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदर महापालिकेकडे केली होती. त्यावरून प्रशासनाने केवळ तीन प्रकल्प बंद केले होते, तर उर्वरित दोन प्रकल्पांना मुदतवाढीच्या नावाखाली सूट देण्यात आली होती.
दरम्यान गुरुवारी झालेल्या अपघातानंतर आरएमसी प्लांटचा मुद्दा पुन्हा पेटून उठला. भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी काशिमीरा येथील प्रभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. परिणामी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सायंकाळी सुरू असलेल्या दोन प्रकल्पांपैकी एका प्रकल्पावर जप्तीची कारवाई केली. शाळेच्या आवारापासून केवळ २०० मीटर अंतरावर हा प्रकल्प सुरू असल्याने कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाने बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद आहे. मात्र मुलाचा जीव गेल्यानंतरच नियमांची आठवण झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
रुग्णालयाविरोधातही तक्रार
नीलकमल नाक्यावर झालेल्या अपघातानंतर सन्नी राठोडला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसत होती. मात्र पुढील उपचारासाठी पैशांची अडचण असल्याने डॉक्टरांकडून दिरंगाई झाली. परिणामी रात्री मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी काशिमीरा पोलिसांकडे दिली आहे. या तक्रारीनंतर रुग्णालय व्यवस्थापक व डॉक्टरांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून, लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.