वसई :- वसई विरार शहरात वाहतूक नियोजनचा अभाव, खड्डे, नियमबाह्य पध्दतीने चालविले जाणारे टँकर, बेकायदा रिक्षा अशा विविध समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मंगळवारी वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मनसेने मोर्चा काढत आंदोलन केले. वाहतूकदारांना शिस्त लावली नाही तर त्याला आम्ही शिस्त लावू असा इशारा परिवहन विभागाला आंदोलकांनी दिला आहे.
वसई विरार शहरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः सद्यस्थितीत वाहतूक ही शहरातील मोठी समस्या निर्माण होऊ लागली आहे. विविध प्रकारच्या वाहतूक संबंधित समस्या घेऊन मनसे वाहतूक सेने तर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन केले.

पालिकेच्या बस मधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन वाहतूक करणे, विना परवाना रिक्षांचा झालेला सुळसुळाट, तर नियमबाह्य पद्धतीने चालविले जाणारे टँकर व त्याद्वारे घडणारे अपघात, बेशिस्त पध्दतीने चालविली अवजड वाहने, रस्त्यांची दुरवस्था असतानाही परिवहन विभागाकडून नोंदणी दरम्यान घेतला जाणारा रस्ते कर अशा विविध समस्यांना घेत हे आंदोलन करण्यात आले.
परिवहन विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जात नसल्याने अशा समस्या निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे. बेदरकारपणे टँकर चालविले जात आहेत. कोणतेही नियम पाळले जात नाहीत त्यामुळे अपघाताच्या घटना समोर येतात. त्याकडे परिवहन विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी इथे जो टँकरमुळे अपघात झाला. त्या टँकरचे फिटनेस प्रमाणपत्र ही नव्हते जर अशा गाड्या शहरात चालत असतील तर ते धोकादायक असेही जाधव यांनी सांगितले.
तर दुसरी पालघर जिल्ह्यात अवजड वाहनांना ही शिस्त लावली जात नाही. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्यात रुग्णवाहिका अडकतात यावर परिवहन विभागाचे नियंत्रण नाही. जर आठ दिवसांत यांनी या अवजड वाहनांना शिस्त लावली नाही तर आमचे कार्यकर्ते यांना शिस्त लावतील असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. यात मनसेचे संजय नाईक,जयेंद्र पाटील, प्रवीण भोईर यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
माझ्या आईला न्याय द्या…
मे महिन्यांत विरार पूर्वेच्या भागात टँकरच्या धडकेत चंदनसार कोपरी परिसरात राहणाऱ्या संजना राणे या महिलेचा मृत्यू झाला होता. आपल्या आईचा फोटो हातात घेऊन तिची चिमुकली मुलगी ही या आंदोलनात सहभागी झाली होती. माझ्या आईला न्याय द्या अशी मागणी त्या मुलीने यावेळी केली.