लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई – पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावललेले खासदार राजेंद्र गावित कमालिचे नाराज असून त्यांनी प्रचारापासून दूर राहणेच पसंद केले आहे. त्यामुळे रविवारी वसई विरारमध्ये गावित यांच्याशिवाय महायुतीचे उमेदावर हेमंत सावरा यांनी प्रचार सुरू केला आहे. गावित प्रचारात नसले तरी शिवसेना गटाचे पदाधिकारी मात्र प्रचारात उतरले आहेत.

रविवार हा प्रचाराचा महत्वाचा दिवस असल्याने सर्वच पक्षांनी आज भरगच्च प्रचाराचा कार्यक्रम आखला आहे. रविवारी महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांचा प्रचारदौरा वसई विरार शहरात सुरू झाला आहे. विरारच्या जीवदानी मंदिरात आशिर्वाद घेऊन सावरा यांना प्रचाराला प्रारंभ केला. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. पालघर लोकसभा मतदारसंघातून ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांची नाराजी अद्याप कायम आहे.

आणखी वाचा-लव्ह जिहादची धमकी देऊन मागितली ३० लाखांची खंडणी, भाईंदरमध्ये महिलेला अटक

राजेंद्र गावित यांनी सावरा यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे. संध्याकाळी वसईत महायुतीची जाहीर सभा असून त्याला देखील ते उपस्थित राहणार नाहीत. ‘माझ्यावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे सध्या तरी मी प्रचारात नाही असे गावित यांनी सांगितले. मतदारसंघाता काही दिवसांपूर्वी मी माझ्यासाठी मते मागत होतो आणि आता माझ्याऐवजी दुसर्‍याला मते द्या असे सांगणे मला जड जात आहे’, असे गावित यांनी सांगितले. संध्याकाळी मला दुसर्‍या कामाला जायचे असल्याने मी प्रचार सभेला उपस्थित राहणार नाही, असेही ते म्हणाले.

शिवेसेना (शिंदे गट) पदाधिकारी मात्र प्रचारास सहभागी

शिंदे गटाचे खासदार प्रचारात नसले तरी शिंदे गटाचे पदाधिकारी प्रचारात सहभागी झाले आहेत. आम्ही सकाळपासून प्रचारात आहोत. महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांना आम्ही विजयी करू, असे शिवेसना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर यांनी सांगितले. आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात सक्रीय आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील गावित यांची भेट घेतली आहे. त्यांना मान सन्मान दिला जात आहे. खासदार गावित यांचे योग्य ते पुर्नवसन केले जाईल असेही तेंडोलकर यांनी सांगितले.

आणखी वाचा-परदेशात नोकरीच्या आमिषाने दिडशे तरुणांची फसवणूक, नवघर पोलिसांकडून टोळीतील तिघांना अटक

गावितांची नाराजी दूर होईल- भाजपाला विश्वास

पद न मिळाल्यास कार्यकर्ता नाराज होतो. गावितांची खासदारकीची उमेदवारी डावल्याने ते नाराज होणे स्वाभाविक आहे. परंतु आम्ही त्यांची नाराजी दूर करू आणि ते प्रचारास सहभागी होतील, असे भाजपाचे प्रसिध्द प्रमुख आणि उपजिल्हाध्यक्ष मनोज बारोट यांनी सांगितले.