वसई: शनिवारी रात्रीपासूनच शहरात पावसाने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. या जोरदार पावसामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत होऊ लागली आहे. साचलेल्या पाण्यात अडकून पडत असलेली वाहने क्रेन मदतीने बाहेर काढावी लागत आहेत.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर पावसाळ्यात पावसाचे पडणारे पाणी वाहून जावे यासाठी नैसर्गिक नाले होते. मात्र मागील चार ते पाच वर्षांपासून पाणी जाण्याचे अनेक मार्ग बंद झाले आहेत. याशिवाय महामार्गाच्या लगत मोठ्या प्रमाणात माती भराव झाल्यामुळे पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत.
पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्राधिकरणाने जागोजागी करण्यात कलव्हर्ट सुविधा ही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. शनिवारी रात्रीपासून वसई विरार भागात मुसळधार पावसाळा सुरवात झाली आहे. रविवारी सुद्धा पावसाचा जोर कायम राहिला आहे. त्यामुळे महामार्गावरील मालजीपाडा, किनारा हॉटेल, ससूनवघर जवळील जेके टायर समोर, वसई फाटा, सन शाईन हॉटेल समोर, नालासोपारा फाटा, विरार शिरसाड फाटा यासह विविध ठिकाणच्या भागात पाणी तुंबून राहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहतूक अगदी धीम्या गतीने सुरू आहे.
महामार्गावरील शिरसाड उड्डाण पुलाखालील रस्त्यावर पाणी साचले होते. भामटपाडा ते शिरसाड दरम्यानच्या रस्त्यावर साचला होता .येथून चालणाऱ्या चालकांना या साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची वाहने या पाण्यातून नेताना अडकून पडली. यातील दुचाक्या ढकलून काढण्यात आल्या.मात्र चारचाकी व मोठी अडकलेली वाहने हायड्रा क्रेनच्या साहाय्याने बाजूला करावी लागली.