वसई : कृत्रिम तलावांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर वसई-विरार महापालिकेने अनंत चतुर्दशीच्या विसर्जनासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रामुख्याने दहा दिवसांच्या सार्वजनिक मंडळांच्या मोठय़ा मूर्तीचे विसर्जन केले जाणार असल्याने पालिकेने २१ वाहने आणि साडेआठशे कर्मचारी तैनात केले आहेत. समुद्रकिनारी विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून विसर्जन मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे.
शुक्रवारी दहाव्या दिवसांचे विसर्जन होणार असून पालिका आणि पोलिसांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. शुक्रवारी १ हजार १२६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठय़ा मूर्तीचे विसर्जन होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढली आहे. यातील मोठय़ा मूर्तीचे विसर्जन हे समुद्रात केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेने समुद्रकिनारी विशेष व्यवस्था केली आहे. समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्यांचा विस्तार करण्यात आला असून विसर्जन मिरवणुकीतील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. याशिवाय मूर्ती संकलन करून दगडखाणीतील तलावात नेण्यासाठी २१ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे, टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहे. याशिवाय जीवरक्षक तैनात करण्यात आले आहे.
कृत्रिम तलावात ७५ टक्के विसर्जन झाल्याचा दावा
यंदा पालिकेने गणेशोत्सवासाठी नियोजनपूर्वक व्यवस्था केली होती. प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेने ९३ कृत्रिम तलाव तयार केले होते. दीड, पाच आणि सहाव्या दिवसांच्या एकूण २८ हजार ५८९ गणपतीमूर्तीचे विसर्जन झाले, त्यापैकी १८ हजार ३९ गणपती मूर्तीचे विसर्जन हे कृत्रिम तलावात झाले. उर्वरित ७ ते ८ हजार मूर्तीचे विसर्जन हे समुद्रात झाले, तर सुमारे १७०० मूर्तीचे विसर्जन हे तलावात झाल्याची माहिती पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली. नागरिकांनी कृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आयुक्तांनी वसई-विरारमधील नागरिकांचे आभार मानले आहेत.
एकही दुर्घटना आणि नियमांचे उल्लंघन नाही
पालिकेने विसर्जनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे एकही दुर्घटना घडली नाही. याशिवाय गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
अनंत चतुर्दशीच्या विसर्जनासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. विसर्जन मिरवणुकीसह विसर्जनस्थळावर बंदोबस्त ठेवण्यासाठी परिमंडळ २ आणि ३ मिळून एकूण ५४२ पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. त्यात २७ पोलीस निरीक्षक, १३० साहाय्यक पोलीस निरीक्षक, ४१२ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय ९१ गृहरक्षक, १२६ महाराष्ट्र सुरक्षा बल आणि १ दंगल पथक तैनात करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.