वसई:- सोमवारी रात्री नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी येथे महावितरणच्या रोहित्राला आग लागली. या दुर्घटनेत सहा वर्षीय मुलगी होरपळून गंभीर जखमी झाली होती. मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नालासोपारा पश्चिमेच्या सोपारा गावात डांगे वाडी परिसर आहे. याच भागात वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने रोहित्र बसविले आहे. सोमवारी रात्री अचानकपणे या रोहित्राला भीषण आग लागली. या घटनेमुळे आजूबाजूच्या परीसरात खळबळ उडाली आहे. या आगीत तीन जण होरपळून जखमी झाले होते.

यात त्याच परिसरात राहणाऱ्या नसरीन परवीन शेख ( ६) हीचा समावेश होता. सुरुवातीला नसरीन हिला पालिकेच्या बोळींज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांनतर तिला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत असे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आग लागल्याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. विद्युत निरीक्षक यांचा अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही. पुढील प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. असे नालासोपारा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये यांनी सांगितले आहे.

या मुलीच्या झालेल्या मृत्यू नंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना झाली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. विरार पश्चिमेच्या अर्नाळा धसपाडा येथे रोहित्राच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना महावितरणच्या चार कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का लागल्याची घटना घडली होती. यात जयेश घरत (२८) या तरुणाचा मृत्यू झाला होता.

तक्रारी कडे दुर्लक्ष

रोहित्र धोकादायक स्थितीत असल्याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. मात्र त्याकडे महावितरणचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी दुर्लक्ष केले असल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.