वसई:- गुरुवारी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावरील ससूनवघर गावा जवळ ही घटना घडली आहे. रियान शेख असे दीड वर्षीय मुलाचे नाव आहे.
रियान हा आपल्या नातेवाईकांकडे आला होता. गुरुवारी दुपारी खेळता खेळता रियान चौथ्या मजल्यावरून पडला होता. त्यानंतर त्याला तातडीने पेल्हार येथील गॅलक्सि रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होती. मात्र गंभीर स्वरूपाची दुखापत असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्याचा सल्ला दिला होता.
त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून मुंबई येथे उपचारासाठी नेत होते. मात्र मुंबई अहमदाबाद महामार्गावर सकाळपासूनच वर्सोवा पूल ते नायगाव फाटा या दरम्यान मुंबई वाहिनीवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली होती. रुग्णवाहिका बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने ससूनवघर गावाजवळील परिसरात पोहचताच रियान याचा मृत्यू झाला. या घडलेल्या घटनेमुळे महामार्ग प्राधिकरणाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महामार्गावरील वाहतूक कोंडी जीवघेणी
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा ते वसई फाटा दरम्यान सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता जीवघेणी ठरू लागली आहे. ठाणे तसेच घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पहाटे ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ठाणे तसेच घोडबंदर भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत झाली आहे. असे जरी असले तरी या अवजड वाहन बंदीचा परिणाम हा वसई विरार भागातील महामार्गावर होऊ लागला आहे.
गुरुवारी सकाळपासूनच ठाणे व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वर्सोवा पूल ते नायगाव फाटा, वसई फाटा या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. पाच ते सहा तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत असल्याने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला तर दुसरीकडे मुंबई, ठाण्याच्या दिशेने रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना ही बसला. गुरुवारी दुपारी पेल्हार येथे एक १६ महिन्याचा चिमुकला खेळताना चौथ्या मजल्यावरून कोसळून जखमी झाला होता. त्याला तातडीने पेल्हार येथील गॅलक्सि रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर स्वरूपाची दुखापत असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्याचा सल्ला दिला होता.
त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून मुंबई येथे उपचारासाठी नेत होते. मात्र मुंबई अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा पूल ते नायगाव फाटा या दरम्यान मुंबई वाहिनीवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत पाच तास रुग्णवाहिका अडकली होती. त्यामुळे त्या चिमुकल्याला वेळेत उपचार न मिळू शकल्याने त्याचा ससूनवघर जवळ पोहचताच मृत्यू झाला.या घडलेल्या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे. काही महिन्यांपूर्वी वाहतूककोंडीचा फटका बसल्याने पालघर तालुक्यातील छाया पुरव यांचाही रुग्णवाहिकेत मृत्यू झाला होता.
पुरव यांना मुंबईला उपचारासाठी नेत असताना वसई ते घोडबंदर येथे असलेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने त्यांच्यावर पुढील उपचार होऊ शकले नाहीत. ही समस्या आता गंभीर होत चालली असून यामुळे मुंबईत उपचारासाठी जाणाऱ्या पालघर, वसई विरार येथील रुग्णांना याचा फटका बसतो आहे. शासनाने अधिसूचना जारी करताना आजूबाजूच्या भागाचा विचार होणे आवश्यक आहे मात्र तसे न झाल्याने या नियोजन शून्य कामामुळे मोठा फटका बसला असल्याची प्रतिक्रिया भूमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी दिली आहे.
अवजड वाहनांमुळे कोंडीत वाढ
ठाणे – घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही अवजड वाहने ही वर्सोवा पुलाजवळ, ससूनवघर, चिंचोटी, नायगाव अशा भागात पोलिसांकडून अडवली जात आहेत. ही अवजड वाहने अगदी मुख्य रस्त्यातच उभी केली जात असल्याने ये जा करण्याचा मार्ग अरुंद होऊ लागला आहे. त्यामुळे कोंडीत अधिकच भर पडत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. त्यातच विरुद्ध दिशेने वाहने काढणे व वाहने बंद पडणे याचाही फटका बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे घोडबंदर मार्गावर बंदी असल्याने अनेक अवजड वाहने ही चिंचोटी- कामण, भिवंडी मार्गावर सोडली जात असल्याने त्या मार्गावर ही कोंडी होऊन तेथील भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांनी सांगितले आहे.
कोंडीचा गावांना फटका
महामार्गलगत ससूनवघर, मालजीपाडा, ससूपाडा, बोबतपाडा, पठारपाडा, यासह अनेक खेडीपाडी आहेत. येथे मोठ्या संख्येने लोकवस्ती आहे. येथील नागरिकांचा दळणवळण करण्याचा महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. येथील नागरिकांना लागणाऱ्या दैनंदिन भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय उपचार, व इतर कामासाठी ठाणे, काशीमिरा, वसई , नायगाव यासारख्या ठिकाणी जावे लागते. परंतु वाहतूक कोंडीची समस्या अधिकच वाढू लागल्याने नागरिकांच्या दळणवळणावर याचा मोठा परिणाम झाला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.