भाईंदर : भाईंदरमध्ये धोकादायक इमारतीवर कारवाई करताना सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाच्या खबरदारीकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. परिणामी, इमारत पाडण्याच्या दरम्यान बांधकामाचा ढिगारा थेट मुख्य रस्त्यावर पडत असून, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.तसेच अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.भाईंदरमधील गोडदेव नाक्यावर असलेल्या एका जुन्या इमारतीला महापालिकेकडून धोकादायक घोषित करण्यात आले होते. त्यामुळे ती इमारत रिकामी करून पाडकामाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे काम करताना सुरक्षेच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, खाली पडणारा बांधकामाचा ढिगारा थेट रस्त्यावर येत आहे.

गोडदेव येथील हा रस्ता भाईंदरचा मुख्य मार्ग असून, याच मार्गावरून मिरा रोड, मुंबई आणि अन्य ठिकाणांसाठी बससेवा तसेच इतर वाहने नियमितपणे धावत असतात. तसेच स्थानिक नागरिकांची रहदारी या मार्गावरून होत असते. मात्र, रस्ता अडवल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.धक्कादायक बाब म्हणजे, पडलेल्या ढिगाऱ्यात मोठ्या दगडांचा, लोखंडी सळ्यांचा आणि विटांचा समावेश आहे. त्यामुळे हे साहित्य रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या चाकांखाली आल्यास अपघात घडण्याची शक्यता आहे. पदचारी प्रवाशांनाही धोका निर्माण झाला आहे.

गोडदेव बसथांबा मोडकळीस

इमारत पाडकामाचे नियोजन न करता केलेल्या कारवाईचा फटका रस्त्यासह परिसरातील सार्वजनिक सुविधांनाही बसला आहे. गोडदेव नाक्यावर असलेल्या बस थांब्यावर बांधकामाचा मलबा पडल्यामुळे तो थांबा मोडकळीस आला आहे.सदर बसथांबा स्टीलच्या रचनेत उभारण्यात आलेला असून, त्यासाठी महापालिकेला सुमारे २० लाख रुपये खर्च आला होता. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा खर्च इमारत धारकांकडून वसूल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

महापालिकेच्या नियमांकडे दुर्लक्ष

जुन्या इमारतीचे पाडकाम करताना महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाकडून परवानगी दिली जाते. या परवानगीत आवश्यक सुरक्षा नियम आणि खबरदारीचा स्पष्ट उल्लेख असतो. मात्र, शहरातील विविध ठिकाणी पाडकामाच्या वेळी या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे.

“धोकादायक इमारतीवर महापालिकेमार्फत कारवाई केली जाते. तसेच काही ठिकाणी इमारती धारक स्वतः इमारती मोकळी करून इमारत पाडण्याचे काम करतात.त्यामुळे एखाद्या ठिकाणी नियमांचे पालन केले गेले नसल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल ” नरेंद्र चव्हाण, अतिक्रमण विभाग प्रमुख