वसई: रविवारी नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पोलिसांनी धाड टाकून अमली पदार्थाच्या कारखान्यावर कारवाई केली होती. पेल्हार पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार सुरू असूनही येथील पोलीस अनभिज्ञ होते. याप्रकरणी आता पोलीस आयुक्तांनी थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्यावरच निलंबनाची कारवाई केली आहे.

नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील रशीद कंपाऊंड परिसरात छुप्या मार्गाने मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थांची निर्मिती करणारा कारखाना चालविला जात होता. याची माहिती अमली पदार्थाच्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी परिमंडळ सहाच्या पथकाने नालासोपाऱ्यात कारखान्यावर छापा टाकून साडेतेरा कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त करून याप्रकरणी पाच जणांना अटक केली होती.

मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. ज्या भागात अमली पदार्थाचा कारखाना सुरू होता तो पेल्हार पोलीस ठाण्यापासून २०० ते ३०० मीटर अंतरावर सुरू होता. अगदी पोलीस ठाण्याच्या जवळच अमली पदार्थ निर्मिती व तस्करीचे प्रकार सुरू असूनही पोलीस यापासून अनभिज्ञ होते. त्यामुळे पेल्हार पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

सोमवारी अखेर मिरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी थेट पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्यावरच निलंबनाची कारवाई केली आहे. त्याबाबतचे आदेश त्यांनी जारी केला आहे.

कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका

मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईचे ठिकाण पेल्हार पोलीस ठाण्यापासून २०० ते ३०० मीटर अंतरावर आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांची चौकशी केली असता. याबाबत अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या अंतर्गत दुय्यम अधिकारी, बीट अधिकारी, गुन्हे शोध पथक हे थेट कार्यरत असताना देखील त्यांनी हाताखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना परिणामकारक गस्त घालणे, त्यांचकडुन गोपनीय माहिती मिळविणे, अवैध व्यवसायांवर कारवाई करणे यामध्ये अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही निलंबनाची कारवाई केली आहे