प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढल्याकडे पालिकेचे दुर्लक्ष
विरार : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. पालिकेकडून याविरोधात होणारी कारवाई मंदावली असल्याने वसईत पुन्हा प्लास्टिकचा विळखा वाढत चालला आहे. पालिकेने एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२१ कालावधीत केवळ ८०३ किलो प्लास्टिक जप्त केले तर केवळ २ लाख एक हजार रुपये दंडवसुली केली आहे. राज्य शासनाने २०१८ मध्ये संपूर्ण शहरात प्लास्टिकवर बंदी आणली होती. त्यानंतर पालिकेने कडक कारवाई करत नागरिकांना कागदी कापडी पिशव्यांची सवय लागली होती; पण करोनाकाळात ही कारवाई थांबली असल्याने पुन्हा शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. करोनानंतर अनेकांचे रोजगार गेल्याने त्यांनी रस्त्यावरील छोटे-मोठे धंदे सुरू केले. यामुळे शहरातील फेरीवाल्यांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे.
सणाच्या निमित्त बाजारपेठेत हजारो फेरीवाले या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना आढळून आले. यामुळे आता प्लास्टिक पिशव्या थर्माकोल पत्रावळय़ा, भाजी वा किराणा साहित्यासाठीच्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या सर्रास मिळत आहेत. यामुळे मोठय़ा प्रमाणात शहरात प्लास्टिक पिशव्या वापरल्या जात आहेत. तर पालिकेकडूनसुद्धा या पिशव्या वापरांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. यामुळे फेरीवाले बिनदिक्कत पिशव्या वापरत आहेत. वसई-विरार महानगरपालिका स्वच्छता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एपिल २०१९ ते मार्च २०२० मध्ये पालिकेकडून ६०० हून अधिक ठिकाणी कारवाई करत २ टन प्लास्टिक जप्त केले केले होते, तर या वर्षी पालिकेने ५ लाख ८९ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला होता, तर एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत २.७ टन प्लास्टिक जप्त केले होते. यात पालिकेने ७ लाख ६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला होता. दोन वर्षांत पालिकेने केवळ ४.०७ टन प्लास्टिक जप्त केले आहे; पण मागील वर्षी मात्र पालिकेकडून यासंदर्भातील कारवाई मंदावल्याने केवळ ८०३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
गोळा केलेल्या प्लास्टिकचे करायचे काय?
पालिकेने जप्त केलेले प्लास्टिक पालिकेच्या गोदामात पडून आहे. त्याच्या पुनर्निर्मितीची कोणतीही योजना पालिकेने आखली नाही. यामुळे कारवाईत जप्त केलेल्या प्लास्टिकचे करायचे काय, असा सवाल पालिकेसमोर उभा आहे. त्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या साहाय्याने हे प्लास्टिक लिलाव पद्धतीने विकले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
करोनाकाळात कारवाई शिथिल करण्यात आली होती; पण आता जनजीवन सुरळीत झाल्याने पालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे
– नीलेश जाधव, मुख्य आरोग्य अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका