भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्ड्यांनी डोकेवर काढले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून, अपघातांचा धोका अधिकच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून मिरा-भाईंदर शहरात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या या पावसामुळे नागरिक संभ्रमात पडले आहेत. अधूनमधून कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर खड्डे निर्माण होऊ लागले आहेत. परिणामी या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून, वाहतुकीत मोठे अडथळे निर्माण होत आहेत.
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम प्रशासनाने महिनाभरापूर्वीच केले होते. मात्र पावसाच्या आगमनामुळे या मार्गांवर पुन्हा खड्डे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. तर अंतर्गत डांबरी रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. यात हाटकेश, गोविंदनगर, हैदरी चौक, जे. पी. रोड आणि फाटक रोड यांचा समावेश आहे.यावर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत दोन ठिकाणी जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता अंतर्गत मार्गांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते जय ठाकूर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
लवकरच काम सुरू करण्याचा पालिकेचा दावा
मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात झाल्यास महापालिकांना भरपाई, वैद्यकीय खर्च आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मिरा-भाईंदर महानगरपालिकेने रस्त्यांच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे.या कामांसाठी नुकतीच ५० कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करून प्रशासकीय ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच खड्डे भरण्याची तसेच रस्त्यांच्या इतर देखभालीची कामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
“शहरातील धुळीची, खड्ड्याची व इतर कामे लवकर पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र पावसामुळे त्यात व्यत्यय निर्माण होत आहे.” राधा बिनोद शर्मा – आयुक्त ( मिरा भाईंदर महानगरपालिका)
